पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. आजपर्यंत मुंबईसह इतर काही शहरांमध्ये लाचखोर अधिकाऱ्यांवर मोठ्या धाडी पडल्या आहेत. यात पुण्याचा समावेश नव्हता. मात्र शुक्रवारी ही उणीव देखील भरून निघाली आहे. सीबीआयने आठ लाख रुपयांची लाच घेताना एका अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर त्याच्या कोट्यवधीच्या मालमत्तेवरही टाच आणली.
पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील अपर आयुक्त डॉ. अनिल रामोड याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस त्याच्यासंदर्भात लाचखोरीच्या तक्रारी सीबीआयला प्राप्त झाल्या होत्या. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे भूसंपादन प्रकरणात नव्याने मोबदला देण्याच्या उद्देशाने रामोड याने लाच मागितली होती. त्यामुळे संबंधित शेतकऱ्याने सीबीआयकडे तक्रार केली. त्यानंतर सीबीआयने सापळा रचून त्याला ८ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर रामोड याच्या विधानभवनातील कार्यालयात पाच तास कारवाई करून सीबीआयने त्याला अटक केली.
रामोड याने अचानक भोवळ आल्याचा बनाव केला, पण सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याला पाणी प्यायला दिले आणि कारवाई केली. त्याचवेळी अशाप्रकारच्या लाच घेऊन रामोड याने किती संपत्ती जमा केली आहे, हे तपासण्यासाठी त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे. रामोड याचे विधानभवनातील कार्यालय, क्विन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थान आणि बाणेर येथील घर याठिकाणी एकाचवेळी छापे मारण्यात आले.
३० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आणि यात ६ कोटी रुपये रोख सीबीआयच्या हाती लागले. सीबीआयला पैसे मोजण्यासाठी दोन मशीन्स मागवाव्या लागल्या. यासोबतच डेक्कन येथे एक हॉटेल आणि एक फ्लॅट, बाणेर येथे एक फ्लॅट, छत्रपती संभाजीनगर येथे एक फ्लॅट आणि एक भूखंड त्याने जमवला आहे. नांदेड येथील मूळ गावी सुद्धा त्याच्या नाव १५ कोटींहून अधिक किंमतीची जमीन आहे.
आज न्यायालयात
डॉ. रामोड याला सीबीआयच्या वतीने आज (शनिवार) शिवाजीनगर (पुणे) येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यामध्ये पुढील चौकशीसाठी सीबीआयकडून त्याच्या कोठडीची मागणी केली जाऊ शकते.
प्रमोशन झाले तरीही
अनिल रामोड हा लातूर येथे जातपडताळणी समितीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होता. त्यानंतर त्याला २०२० मध्ये आयएएस म्हणून पुण्यात पदोन्नती मिळाली. तेव्हापासून तो पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयूक्त म्हणून कार्यरत आहे. पदोन्नती होऊन गलेलठ्ठ पगार आणि सोयीसुविधा असतानाही माया जमवण्याचा मोह त्याला आवरला नाही.
CBI Pune bribe Corruption IAS Anil Ramode