मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात खंडणी मागितल्याच्या आरोप असलेल्या समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात आता वानखेडे यांच्या कुटुंबीयांची चौकशी होणार आहे. यामध्ये वानखेडे यांची वडील आणि बहिणीचा समावेश आहे.
एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यासह इतरांवर सीबीआयने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांना येत्या 8 जूनपर्यंत हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांची सलग दोन दिवस चौकशीदेखील केली. आता सीबीआय समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयांची चौकशी करणार आहे.
प्राप्त माहितीनुसार, आज सकाळी १० वाजता समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची बहीण दोघेही सीबीआय कार्यालयात सीबीआय चौकशीसाठी जाणार आहेत. सीबीआयचे पथक दोघांचा जबाब नोंदवून घेणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणात नेमक्या काय घडामोडी घडतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सीबीआय अॅक्टिव्ह मोडवर
समीर वानखेडे प्रकरणात सीबीआय अॅक्टिव्ह मोडवर आली आहे. अचानकरित्या प्रकरणाचा तपास झपाट्याने सुरू झाला आहे. मुख्य म्हणजे वानखेडे यांच्याशी संबंधित एकूण एक घटकावर सीबीआयचा वॉच आहे. त्यानुसार, ही चौकशी सुरू आहे. सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यानंतर एका पथकाने थेट समीर वानखेडे यांचे मुंबईतील घर गाठत छापा टाकला. या छाप्यातून सीबीआय अधिकाऱ्यांना नेमकी काय माहिती मिळाली, याबाबतची सविस्तर माहिती समजू शकलेली नाही. पण, वानखेडे यांच्याशी संबंधित आणखी काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.
CBI NCB Officer Sameer Wankhede Trouble