नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तब्बल २६,१४३ कोटींची कंपनी केवळ एकच कर्मचारी सांभाळत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. रोटोमॅक समूहाचा कर्ज घोटाळा पाहून मोठ्या घोटाळ्यांचा तपास करणाऱ्या सीबीआयलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. रोटोमॅकने केवळ चार कंपन्यांसोबत २६,१४३ कोटी रुपयांचा व्यवसाय केल्याचे तपासात समोर आले आहे. या कंपन्यांचा पत्ताही एकच असून, हा १५०० चौरस फुटांचा हॉल आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या चारही कंपन्यांमधील कर्मचारीही एकच आहेत. ते कंपनीचे सीईओही आहेत.
या ‘हवाई’ कंपन्यांसोबत कोट्यवधींचा व्यवसाय होत असल्याच्या जोरावर बँकांनी रोटोमॅकला २१०० कोटी रुपयांचे कर्जही दिले. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने रोटोमॅक ग्लोबलचे संचालक राहुल कोठारी, साधना कोठारी आणि अज्ञात अधिकार्यांविरुद्ध ९३ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला. आणि आता तपासात अनेक गुपिते उघड होत आहेत.
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, रोटोमॅक समूहासोबत व्यवसाय करणाऱ्या चार कंपन्या रोटोमॅकचे सीईओ राजीव कामदार यांचा भाऊ प्रेमल प्रफुल कामदार यांच्या मालकीच्या आहेत. रोटोमॅकने या चार कंपन्यांना कागदी उत्पादने निर्यात केली. या सर्व कंपन्या बंज ग्रुपकडून रोटोमॅकला माल विकत होत्या. म्हणजे माल बनवणारी कंपनीच आपला माल विकत घेत होती.
२६ हजार कोटींची उलाढाल दाखवणाऱ्या चार कंपन्यांमध्ये प्रेमल प्रफुल्ल कामदार हे एकच कर्मचारी असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. पोर्टपासून ते लोडिंग-अनलोडिंग, बिलिंग, अकाउंटिंग, डिलिव्हरी अशी सगळी कामं तो १५०० स्क्वेअर फुटांच्या खोलीत बसून करत होता. अशा हवाई कंपनीसोबत व्यवसायाच्या आधारे बँकांनी २१०० कोटी रुपयांची कर्जमर्यादा कशी दिली, असा प्रश्नही सीबीआयला पडला आहे. त्यामुळेच बँक अधिकाऱ्यांनाही संशयाच्या भोवऱ्यात ठेवण्यात आले आहे.
CBI Investigation 26 Crore Company Single Employee
Rotomac Loan Scam Fraud Crime Bank Finance
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD