इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी), सांताक्रूझ विभाग, मुंबईचे अधीक्षक आणि निरीक्षक यांना तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली आहे.
सीबीआयने ७ ऑक्टोंबर रोजी आरोपी सीजीएसटी अधिकाऱ्यांनी एका खाजगी फर्मला अनुकूल अहवाल देण्यासाठी आणि जीएसटी नोंदणी सुलभ करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला. ही फर्म कापडाच्या व्यापारात गुंतलेली आहे आणि २४ सप्टेंबर २०२५ रोजी जीएसटी नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता.
३ ऑक्टोंबर २०२५ रोजी तपासणी दरम्यान, आरोपी निरीक्षकाने स्वतःसाठी आणि त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासाठी लाच मागितली होती आणि धमकी दिली होती की अशा देयकांशिवाय जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र जारी केले जाणार नाही.
सीबीआयने सापळा रचला आणि ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी सीजीएसटी पश्चिम मुंबई कार्यालयात २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही आरोपींना रंगेहाथ पकडले. आरोपी अधिकाऱ्यांच्या परिसरात झडती घेण्यात आली. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना मुंबई येथील सक्षम न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.