इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सायबर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे. सीबीआय आर्थिक गुन्हे शाखेच्या (ईओबी) मुंबई विभागाने विशिष्ट माहितीच्या आधारे आणि पडताळणी केल्यानंतर एका म्यूल खातेदार (फसवणूकीसाठी वापरण्यात आलेले बँक खाते); अज्ञात सायबर फसवणूक करणारे; अज्ञात बँक अधिकारी आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात सायबर गुन्हे केल्याबद्दल गुन्हे दाखल केले आहेत. २ जुलै रोजी एकाच दिवसात सुमारे ३.८१ कोटी रुपये विविध सायबर फसवणुकीच्या पीडितांकडून म्यूल खात्यात जमा झाले होते. सदर खात्यात जमा झाल्यानंतर, हे पैसे प्रथम संपूर्ण भारतात उघडलेल्या शंभराहून अधिक म्यूल खात्यांमध्ये वळवण्यात आले, आणि अखेर प्रत्यक्ष सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यात आले.
संबंधित बँक अधिकारी आणि दलाल यांनी हे म्यूल खाते योग्य केवायसी प्रक्रिया, ग्राहक सत्यापन किंवा सुरुवातीच्या जोखमीचे मूल्यांकन न करता उघडल्याचा कट सीबीआयच्या तपासादरम्यान उघडकीस आला. भारतीय रिझर्व बँकेच्या मास्टर परिपत्रकानुसार जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे आणि बँकेने जारी केलेल्या काही अंतर्गत मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचेही उघडकीस आले.
तपासादरम्यान सीबीआयने अनेक गुन्हेगारी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे, मोबाईल फोन, आयपॅड, बँक खाते उघडण्याचे कागदपत्रे, व्यवहार तपशील, केवायसी कागदपत्रे इत्यादी जप्त केले. मुंबईत म्यूल खाती उघडण्यासाठी मदत करणाऱ्या दलालांची, नागपूरमध्ये खातेधारकांच्या राहण्याची व्यवस्था करणाऱ्यांची आणि नागपूरमधून दलालांच्या माध्यमातून इतर म्यूल खात्यांमध्ये निधी हस्तांतरित करण्यात सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्यात सीबीआयने यश मिळवले. नागपूरमधील दलाल आणि म्यूल खातेधारकांना क्रिप्टोकरन्सीमध्ये त्यांचे कमिशन मिळाले असल्याचे देखील तपासात आढळून आले होते, जे पुढे सह-कारस्थान करणाऱ्यामध्ये वाटण्यात आले. अटक केलेले तिघे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.