विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली :
साधारणत : दहावी – बारावी बोर्ड परीक्षा असो की स्कॉलरशिप परीक्षा यामध्ये गैरकारभार किंवा घोटाळे होण्याचे प्रकार यापुर्वी घडले आहेत. इतकेच नव्हे तर एमपीएससी परीक्षेत देखील गैरप्रकार झाल्याचे अनेकदा उघड झाले आहे. परंतु देशातील अत्यंत हुशार विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाकरिता पात्रता प्रवेशपरीक्षा म्हणून ज्याचा उल्लेख केला करण्यात येतो, अशा जेईई मुख्य परीक्षेत देखील एका खासगी संस्थेच्या संगणमताने गैरकारभार झाल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी सीबीआयने देशभरातील १९ ठिकाणी धाडी घातल्या आहेत. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे
सीबीआयने गुरुवार, दि. ३ ऑगस्ट रोजी जेईई (मेन्स) परीक्षा २०२१ मधील कथित गैरकारभार आणि अनियमितता संदर्भात देशभरातील अनेक ठिकाणी छापे टाकले. तसेच या प्रकरणी सीबीआयने अॅफिनिटी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ही खासगी संस्था त्याच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल केला. या संस्थेचे संचालक सिद्धार्थ कृष्णा, विश्वंबर मणि त्रिपाठी आणि गोविंद वाष्णव त्यांनी जेईईच्या ऑनलाईन परीक्षेत सहयोगी प्राध्यापक आणि परीक्षा केंद्रावर तैनात कर्मचारी आणि अन्य अज्ञात व्यक्तींच्या संगनमताने संशयास्पद गैरव्यवहार केला आहे. सीबीआयच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणाले की, सदर आरोपी हे जेईई (मेन्स) च्या ऑनलाईन परीक्षेत फेरफार करत होते. हे आरोपी हरियाणाच्या सोनीपत येथील निवडक परीक्षा केंद्रातून ऑनलाईन पध्दतीद्वारे अनेक अर्जदारांच्या प्रश्नपत्रिका सोडवत, त्याकरिता आयआयटीच्या नामांकीत महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ते भरमसाठ रक्कम लूबाडत असत.
विशेष म्हणजे सदर आरोपी हे इच्छुक विद्यार्थ्यांकडून १० वी आणि १२ वी च्या मार्कशीट, यूजर आयडी, पासवर्ड आणि पोस्ट-डेट चेक सुरक्षा म्हणून घेत असत. तसेच एकदा प्रवेश झाल्यानंतर देशभरातील प्रत्येक उमेदवारांकडून १२ ते १५ लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम गोळा करत. यासंबंधीची माहिती मिळताच सीबीआयच्या टीमने दिल्ली आणि , पुणे, जमशेदपूर, इंदूर आणि बंगळुरूसह देशात १९ ठिकाणी छापे घातले, त्यात २५ लॅपटॉप, ७ कॉम्प्यूटर, सुमारे ३० पोस्ट डेटेड चेक तसेच विविध विद्यार्थ्यांच्या मार्कशीट मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. या प्रकरणी अनेकांची चौकशी करण्यात येत आहे.