इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील इंडियन बँकेच्या मंडळातील वकिलाला तक्रारदाराकडून १.७० लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी आणि ती स्वीकारल्या प्रकरणी अटक केली आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने १० डिसेंबर २०२४ रोजी महाराष्ट्रातील इचलकरंजी येथे राहणाऱ्या इंडियन बँकेच्या मंडळातील वकिलाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला होता. या वकिलाविरुद्धच्या आरोपात तक्रारदाराकडून त्याने २.५ लाख रुपयांची लाच मागितल्याचे आणि नंतर वाटाघाटी करून १.८० लाख इतकी रक्कम लाच स्वरूपात मागितल्याचे म्हटले आहे.
सरफेसी (SARFAESI) कायद्यांतर्गत तक्रारदाराच्या गहाण ठेवलेल्या मालमत्तेचा ताबा देण्याच्या बदल्यात ही लाच मागितली गेली होती. तक्रारदाराने ५.५ कोटी रुपयांच्या कर्जासाठी आपली मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवली होती, तिचे नंतर नॉन-परफॉर्मिंग ऍसेट (NPA) मध्ये रुपांतर झाले होते. वाटाघाटीनंतर आरोपींनी लाचेची रक्कम १.७० लाखापर्यंत कमी करण्याचे मान्य केले.
या माहितीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने सापळा रचला आणि आरोपीला त्याच्या कार्यालयात तक्रारदाराकडून १.७० लाख रुपयांची लाच मागताना आणि ती स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. केंद्रीय अन्वेषण विभागाने महाराष्ट्रातील इचलकरंजी येथील आरोपींच्या निवासस्थानी आणि अधिकृत जागेवर झडती घेतली, ज्यामध्ये प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली. आरोपीला महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील जिल्हा न्यायाधीश-1 यांच्यासमोर ११ डिसेंबर रोजी हजर केले जाईल. ज्या प्रकरणाचा पुढील तपास चालू आहे.