मुंबई – पश्चिम बंगाल मधील कोळसा माफिया अनुप मांझी उर्फ लाला याच्या विरोधात कार्यवाही करीत असताना सीबीआय आणि प्रवर्तन निदेशालय अर्थात ई.डी.च्या हाती एक अशी गोष्ट लागली आहे. ज्यामुळे झारखंड राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांचे चेहरे चिंतेने काळे पडण्याची शक्यता आहे. हे ते जनप्रतिनिधी आहेत, ज्यांना लाला च्या माध्यमातून बरीच मलाई मिळाली आहे. या सगळ्यांची नावे लालाने ज्या एका डायरीत लिहून ठेवली आहेत, ती डायरीच सीबीआयच्या हाती लागली असल्याची चर्चा आहे. यात झारखंड तसेच पश्चिम बंगाल राज्यातील मोठे नेते आणि पोलीस अधिकारी यांची नावे असल्यामुळे अनेकजण धास्तावले असल्याची माहिती आहे.
झारखंड भाजपचे पूर्व प्रदेशाध्यक्ष आणि धनबाद येथून खासदार असलेले पी.एन. सिंग यांनी तर या डायरीतील नावे सार्वजनिक करण्याचे आवाहन केले आहे. त्यांच्या मते यामुळे सत्य समोर येईल.
दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत सिंग यांनी झारखंडच्या ज्या नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची नावे या डायरीत असतील त्यांची सखोल चौकशी करण्याचेसुद्धा आवाहन केले आहे. पश्चिम बंगाल राज्यातून अवैध पद्धतीने खणून काढलेला कोळसा जामताडा मार्गे बिहार आणि उत्तर प्रदेशात जात होता, असा आरोप करीत हा अवैध कोळसा गिरिडीह आणि धनबादच्या अनेक कंपन्यांमध्ये जात असल्याचा आरोपही सिंग यांनी केलाय. चौकशी अंती सत्य समोर येईल, असा त्यांचा दावा आहे. सिंग यांनी झारखंड मध्ये रेती उत्खननावर असलेली बंदी उठवण्याची देखील मागणी केली आहे.