नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोरोनाच्या आजारादरम्यान ताप कमी करण्यासाठी डोलो-६५० हे औषध अत्यंत लोकप्रिय झाले. किंबहुना अनेकांच्या तोंडी हे नाव आले होते. आता हा ब्रँड बनवणाऱ्या कंपनीबाबत मोठा खुलासा झाला आहे. डोलो-६५० औषध निर्मात्यावर डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्या उत्पादनांच्या जाहिरातीच्या बदल्यात सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या मोफत भेटवस्तू दिल्याचा आरोप सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने केला आहे. आयकर विभागाने या कंपनीच्या ९ राज्यांमधील लॅबवर ६ जुलै रोजी छापा टाकला होता. बंगळुरूस्थित मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या ३६ परिसरांवर हे छापे टाकण्यात आले होते.
सीबीडीटीने एका निवेदनात सांगितले आहे की, औषध निर्मात्यावर कारवाई केल्यानंतर विभागाने तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची बेहिशोबी रोख रक्कम आणि १ कोटी ४० लाख रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. या संदर्भात मायक्रो लॅबला पाठवलेल्या ई-मेलला कंपनीने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. शोध मोहिमेदरम्यान, कागदपत्रे आणि डिजिटल डेटाच्या स्वरूपात महत्त्वपूर्ण अपराधी पुरावे सापडले आहेत आणि ते जप्त करण्यात आले आहेत, असा दावाही सीबीडीटीने केला आहे.
सीबीडीटीच्या म्हणण्यानुसार, मिळालेल्या पुराव्यावरून असे सूचित होते की कंपनीने आपली उत्पादने/ब्रँड्सचा प्रचार करण्यासाठी अनैतिक पद्धतींचा अवलंब केला आहे. अशी फुकटची रक्कम अंदाजे सुमारे १ हजार कोटी रुपये आहे. सीबीडीटीने अद्याप त्यांच्या निवेदनात या गटाची ओळख पटवली नसली तरी, सूत्रांनी पुष्टी केली आहे की हा गट मायक्रो लॅब आहे.
CBDT Income Tax Medicine Company Doctors Gift 1 thousand crore Dolo650