मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हस्तशिल्पांची निर्यात आणि रिअल इस्टेट उद्योगात असलेल्या एका व्यावसायिक समूहाच्या जागेवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. येथे विभागाला १०० कोटींहून अधिकचे अघोषित उत्पन्न सापडले आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, १६ जून रोजी प्राप्तिकर विभागाने राजस्थान आणि मुंबईतील या व्यवसाय समूहाच्या २५ ठिकाणी सखोल शोध मोहीम राबवली होती. हा समूह हस्तकलेच्या निर्यातीपासून ते रिअल इस्टेटपर्यंतच्या व्यवसायात गुंतलेला आहे. सीबीडीटीने असेही निदर्शनास आणून दिले की छाप्यांदरम्यान जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांवरून असे दिसून येते की, व्यावसायिक समूहाला रिअल इस्टेट व्यवसायातील बेहिशेबी रोख व्यवहारांसह बनावट खरेदी बिले मिळाली आहेत.
या व्यवसाय समूहाच्या उद्योजकाचे, मालकाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. कधीपासून उद्योग सुरु आहे, अघोषित उत्पन्न १०० कोटींपेक्षा किती जास्त आहे का या सगळ्याची तपासणी जोरात सुरु आहे. शिवाय, व्यवसाय मालकाचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे.
शोध मोहिमेदरम्यान, प्राप्तिकर विभागाने अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली ज्यावरून असे दिसून आले की हा गट रिअल इस्टेट व्यवसायात अघोषित रोख व्यवहारांमध्ये गुंतला होता. याशिवाय बनावट खरेदी बिलेही जप्त करण्यात आली आहेत. आयकर विभागाने शोध मोहिमेदरम्यान १.३ कोटी रुपयांहून अधिक किमतीची अघोषित रोकड आणि ७.९ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. याशिवाय आणखी काही सापडते का याचा शोध विभागाकडून घेतला जात आहे.
cbdt income tax industry raid unaccounted income