जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रीया
प्रत्येक पालकांची आपल्या पाल्याच्या पुढील शिक्षणासाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रांचा जमवाजमव करण्यात पालकांची धावपळ होत आहे. पुढील शिक्षणासाठी शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रीमीलियर प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्रहे आवश्यक कागदपत्रे लागत असतात. तर यातील जातवैधता प्रमाणपत्र म्हणजे CASTE VALIDITY CERTIFICATE हे अत्यंत महत्त्वपूर्ण कागदपत्र असून जातवैधता प्रमाणपत्राअभावी अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित राहवे लागू शकते. या लेखात जात वैधता प्रमाणपत्राविषयी असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. यामध्ये जात वैधता प्रमाणपत्र काय असते ? त्यासाठी कोण-कोणत्या यंत्रणा कार्यरत आहेत ? पडताळणी समित्यांची रचना कशी असते ? जातवैधता प्रमाणपत्रासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागत असतात ? याविषयी…
राज्यात जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी सन 2000 मध्ये कायदा करण्यात आला. या कायद्याला महाराष्ट्र्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणी विनियमन ) अधिनियम, 2000 असे म्हटले जाते. या कायद्यानुसार राज्यातील जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज चालविले जाते.
राज्यात अनुसूचित जमातींच्या (ST) प्रवर्गातील जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठीआदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत औरंगाबाद,अमरावती, गडचिरोली, नागपूर, नंदुरबार, नाशिक ,पुणे, ठाणे 8स्वतंत्र समित्या कार्यरत आहेत. या समित्यांकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आदि ‘प्रमाण’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी https://etribevalidity.mahaonline.gov.inया संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. जात पडताळणी समित्यांच्या कामकाजाचे समन्वय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्या माध्यमातून केले जाते.
या समित्यांची रचना आपण पाहू या मित्रांनो,
राज्यात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग(SEBC- मराठा) तील जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत राज्यात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत. या समित्यांकडे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी Caste Certificate Verification Information System (CCVIS) प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यासाठी https://bartievalidity.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय करण्यात आली आहे. जात पडताळणी समित्यांच्या कामकाजाचे समन्वय डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे च्या माध्यमातून केले जाते.
ही समिती 3 सदस्यांची असते. यामध्ये
अध्यक्ष (Chairman)
(या पदावर मंत्रालय सहसचिव/समाज कल्याण अतिरिक्त आयुक्त/महसूल विभागातील अतिरिक्त जिल्हाधिकारी)
सदस्य (Member)
(या पदावर सामाजिक न्याय विभागातील प्रादेशिक उपायुक्त/उपायुक्त)
सदस्य सचिव (Member Secretary)
(या पदावर सामाजिक न्याय विभागातील सहाय्यक आयुक्तजिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद)
या समित्यांमध्ये पोलीस विभागाच्या दक्षता समित्या ही कार्यरत असतात. पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई ही 3 पदे या दक्षता समितीवर असतात. आपण जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कामकाज समजून घेतले. आता जातवैधता नेमकी कोणाला आवश्यक असते. ते आता आपण समजून घेऊ या मित्रांनो, यामध्ये 4 गोष्टी आहेत. यात
शिक्षण- विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जातवैधतेसाठी अर्ज करु शकतो.
इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असतांना.
इंजिनिअरींग, फार्मसी, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, मेडिकल्सच्या विविध कोर्सेसला प्रवेश घेतल्यानंतर
10 वी नंतर व्यावसायीक अभ्यासक्रमातील डिप्लोमा कोर्सेस
MBA/ MCA / BBM /Agriला प्रवेश घेतल्यानंतर.
ज्या अभ्यासक्रमांना शासनाची शिष्यवृत्ती लागू आहे.अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
निवडणूक – या मध्ये एखादा व्यक्ती ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका/नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका, छावणी परिषद (Cantonment Board) व राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यताप्राप्त इतर निवडणूकांमध्ये उमेदवारी करत असेल तर त्यास विजयी झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.
सेवा – यामध्ये एखादा व्यक्ती शासकीय सेवेत आरक्षित प्रवर्गात नोकरीस लागला असेल तर त्यास जातवैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते. किंवा शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तीस पदोन्नतीसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागते.
इतर आवश्यक बाबी –यामध्ये व्यक्तीला जर म्हाडा, सिडको/हुडको या गृहनिर्माण प्रकल्पात घर मिळाले असल्यास किंवा पेट्रोल पंप/गॅस एजन्सी प्राप्त केली असल्यास तसेच काही प्रकरणात मा.न्यायालयाच्या आदेशानुसार जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोण-कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. ते आपण आता पाहू या
जात पडताळणी संकेतस्थळावरून भरलेला ऑनलाईन परीपूर्ण अर्ज
शिफारस पत्र –
अर्जावर संबंधित महाविद्यालय/संस्थांमधील प्राचार्य/सक्षमप्राधिकारी यांचा सही/शिक्का तसेच संबंधीत महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टीफिकेट
निवडणुकी करिता अर्ज असेल तर जिल्हा निवडणूक अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांचे शिफारसपत्र
नोकरीकरिता अर्ज असेल तर नेमणूक अधिकाऱ्याचे शिफारस पत्र
अर्जदाराचा शाळा सोडल्याचा दाखला
अर्जदाराचे वडील/ चुलते/आत्या यांचा शाळा सोडल्याचा दाखला.(अशिक्षित असल्यास दुय्यम पुरावे उदा.जन्म,मृत्यु नोंद/सातबारा उतारा/खरेदी खत/ अशिक्षित असल्याबाबत शपथपत्र)
अर्जदाराचे आजोबा/पंजोबा/खापर पंजोबा याचा शाळा सोडल्याचा दाखलाअथवा जन्म- मृत्यु नोंदणी दाखला (विहित नमुन्यातील तहसील रेकॉर्ड प्रमाणे) गांव नमुना क्र.14 दाखला.
अर्जदाराचे वडील/आजोबा/खापर पंजोबा/चुलत आजोबा/चुलत पंजोबा/चुलत खापर पंजोबा यांच्याशी नातेसंबंध सिध्द होणेसाठी हक्काचे पत्रक (गांव नमुना 6 ड), फेरफार पत्रक,वारस नोंद, कडई पत्रक, खासरा पत्रक,7/12 उतारा इ. तहसिल रेकॉर्डनुसार
(टिप-सदर नोंदी विशेषत मराठा-कुणबी,कुणबी या जातीसाठी लागू आहेत.तर काही प्रकरणात आदिवासी (एस.टी) प्रवर्गासाठी 7/12 आवश्यक आहे)
अर्जदाराचा स्वत:चा जातीचा दाखला, वडीलांचा जातीचा दाखला, आजोबाचा जातीचा दाखला
प्रतिज्ञापत्र वंशावळ(AFFIDAVIT)
स्वयंघोषणापत्र (Self Declaration)
पडताळणी समितीने दिलेले अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडीलांचे किंवा सख्ख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडील रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकाचे उपलब्ध असल्यास वैधता प्रमाणपत्र (24 नोव्हेंबर 2017 च्या शासकीय अधिसूचनेनुसार)
अर्जदाराच्या शालेय प्रवेश नोंदवहीचा उतारा
अर्जदाराच्या वंशावळीतील इतर नातेवाईकांचे नातेसंबंध स्पष्ट करणारे कागदपत्रे जसे कोतवाल बुकातील/पी-1/पी-9/पी-11
अर्जदाराचे वडील किंवा स्वत: अर्जदार शासकीय सेवेत असल्यास मूळ सेवा पुस्तकेच्या पहिल्या पानाची प्रत.
मित्रांनो, जात वैधता प्रमाणपत्रासाठी वरील आवश्यक कागदपत्रे आहेत. यापैकी सर्वच कागदपत्रे अर्जासोबत जोडली पाहिजेत तरच जातवैधता प्रमाणपत्र मिळेल असे नाही. प्रत्येक जातनिहाय यात कागदपत्रांची संख्या कमी-जास्त होऊ शकते.
यात मित्रांनो, प्रत्येक जात प्रवर्गनिहाय कायद्यानुसार जात दावा सिध्द होण्याकामी काही मानीव दिनांक जाहीर करण्यात आले आहेत. या दिनांकापूर्वीचा जातीचा पुरावा किंवा रहिवास पुरावा संबंधित जातीच्या व्यक्तीला सादर करावे लागतात.
अनूसूचित जमातीसाठी – दिनांक 6 सप्टेंबर 1950 पूर्वीचा
अनुसूचित जातीसाठी – दिनांक 10 ऑगस्ट 1950 पूर्वीचा
विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी – दिनांक12नोव्हेंबर 1961 पूर्वीचा
इतरमागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गासाठी – दिनांक13 ऑक्टोबर1967पूर्वीचा
अशा प्रकारे मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे लागत असतात. या कागदपत्रांसह परिपूर्ण अर्ज सादर केल्यास 3 महिन्यांच्या आत आपणास जात वैधता प्रमाणपत्र आपल्या घरी पोस्टाने प्राप्त होऊ शकते. तर पुढील भागात भेटू या एका नवीन शासकीय योजनेच्या माहितीसह धन्यवाद !