पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) : “राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेली २२ कोटींची रोख बक्षिसे ही त्यांच्या कष्टाला दिलेली खरी दाद आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल गजबजून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३३१ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंना एकूण २२ कोटी ३१ लाख रुपयांच्या पारितोषिकाची थेट देणगी मिळाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. कार्यक्रमात “मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर” या महत्वाकांक्षी योजनेच्या लोगोचे अनावरणही पवार आणि क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, माजी क्रीडा प्रशासक नामदेव शिरगांवकर, प्रशिक्षक संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकावले आहे, जे राज्याच्या क्रीडा परंपरेला अभिमानास्पद आहे. “खेळाडूंच्या मेहनतीतून राज्याला मिळालेले यश हे १३ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सामूहिक अभिमानाचे कारण आहे. खेलो इंडियासह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या ५८ कोटींच्या निधीच्या मागणीस तात्काळ मंजुरी दिली आहे. खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा देऊन महाराष्ट्राने ऑलिम्पिकसह जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करावे, हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी पुढे सांगितले की, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे संग्रहालय केवळ खेळाडूंच्या कामगिरीचा ऐतिहासिक दस्तऐवज नसून, नवीन पिढीला प्रेरणा देणारे व खेळात शिस्त, मूल्ये व संस्कार रुजवणारे केंद्र ठरणार आहे.
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की, “आरोग्यदायी महाराष्ट्र, क्रीडामय महाराष्ट्र हे आमचे ध्येय आहे. राज्याचे नवीन क्रीडा धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल. हे धोरण खेळाडूंना न्याय देणारे व त्यांच्या प्रगतीस चालना देणारे असेल. त्यातून महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील.”
फेब्रुवारीत उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून प्रथम क्रमांक मिळविला होता. या यशाचे स्मरण करत राज्य सरकारने ३१८ राष्ट्रीय विजेते व १३ आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूंचा गौरव केला. राज्याच्या क्रीडा धोरण २०१२ नुसार खेळाडू व मार्गदर्शकांना एकूण २८ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली.
दरम्यान, वार्षिक १६० कोटी रुपये खर्च असलेल्या “मिशन लक्ष्यवेध” या महत्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ आज झाला. पहिल्या टप्प्यात ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस या सहा क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्यात आले असून उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक उपकरणे व तज्ज्ञ प्रशिक्षकांची मदत खेळाडूंना देण्यात येईल. या योजनेमुळे महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमध्ये सराव करून जागतिक स्तरावर पदके जिंकण्याची संधी मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले. त्यांनी राज्यातील क्रीडा विकासाची पार्श्वभूमी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा उल्लेख केला. आभारप्रदर्शन सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले.