नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई उच्च न्यायालयात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणातील संशयित तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निखील सैंदाणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता १४ नोव्हेंबर २०२२ रोजी सुनावणी होणार आहे. नाशिकच्या न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर आता उच्च न्यायालयात ही सुनावणी होणार आहे. डॅा.सैंदाणे फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
नाशिक जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी मुंबई, पालघर आणि जळगाव जिल्ह्यातील २१ पोलीस अंमलदारांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज सादर केले होते. या अर्जांमध्ये बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अर्जदार पोलीस अंमलदारांनी त्यांचे नातेवाईकांचे गंभीर आजार असल्याचे बनावट प्रमाणपत्र नाशिक जिल्हा रुग्णालय व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी खगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरु केला आहे.