नाशिक – विजय बिरारी यांच्या मृत्यूप्रकरणी तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्यांविरुध्द मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी २०२० मध्ये चोरीचे सोने विकत घेतल्याच्या संशयावरून तेलंगणा पोलिसांनी बिरारी यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळेस शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीवरून पडून ते मृत्यूमुखी पडले होते. त्यानंतर बिरारी यांच्या मृत्यूपूर्वी नेमके काय झाले, याचा शोध राज्य अन्वेषण विभागाकडून सुरू होता. अखेर या तपासात तेलंगणाच्या तीन पोलीस अधिकार्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. याप्रकरणी तीन पोलीस अधिकार्यांवर मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात शमशाबाद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रुपानी रामुलू व्यंकटेश, शादनगरचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक सादाम कृष्णा व सीसीएस विभागचे पोलीस उपनिरीक्षक एम. डी. खाजाखान अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
चोरीच्या सोन्याच्या प्रकरणाचा सायबराबाद पोलिस तपास करत असतांना आरोपी संतोषकुमार शिंदे याने चोरीचे दागिने बिरारींना विकल्याची कबुली दिली. त्यानंतर तेलंगणा पोलिसांचे पथक नाशिकला आले. हे सर्वजण शासकीय विश्रामगृह येथे थांबले. त्यानंतर सर्व पोलीस पंचवटीतील विजय बिरारींच्या दुकानात कायदेशीर नोटीस किंवा न्यायालयाचे कोणतेही जप्तीचे आदेश नसताना आले. बिरारींसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर न करता अटकेबाबत मार्गदर्शक तत्वांचे पालन केले नाही. त्यांच्याकडे अटक वॉरंट नव्हते. चोरीचे दागिने न दिल्यास हैद्राबादला घेऊन जावू, असे सांगत पोलिसांनी बिरारींवर दबाव टाकला. त्यातून बिरारी ताणतणावाखाली आले. त्यानंतर त्यांनी विश्रामगृहाच्या चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या केली. ही बाब सुनीता बिरारी, अॅड. समीरखान इनामदार, चंदनकुमार चंडीचरणकुमार यांच्या जबाब व तपासातून निष्पन्न झाली. सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्या. या तीन पोलीस अधिकार्यांनी योग्य तो पोलीस बंदोबस्त न देणे, जिविताची खबरदारी न घेणे, बिरारींवर दबाव टाकत आत्महत्येस प्रवृत्त केले. याप्रकरणी पोलीस उपअधीक्षक नम्रता देसाई यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे.