इंडिया दर्पण विशेष लेखमाला
स्वयंपाकघरातील वनस्पती
वेलची (वेलदोडा)
संस्कृत मध्ये एला , हिंदीत इलायची म्हणतात ,इंग्रजीत cardmomum म्हणतात. वेलचीचे अतिशय महत्त्वाचे गुणधर्म आहेत. ते नेमके काय हे आपण आता जाणून घेऊया…

वेलचीची पाने लांबट मोठ्या आकाराची साधारण २० ते ४० सेंमी. लांब व २.५ ते ५ सेमी. रूंद असतात.फुलांचे दांडे लांब असतात व त्याला अनेक हिरवी छोटीफळे लागलेली असतात. त्यांना दोडे म्हणतात.हेच वेलदोडे. या फळांच्या आत तीव्र गंधाचे काळ्या रंगाचे विशिष्ट सुगंध असलेले दाणे असतात.
वेलचीचे दोन प्रकार आहेत.
१) सूक्ष्म एला ही फिकट हिरवट रंगाची आकाराने छोटी असते. स्वयंपाकात, औषधात ही वापरली जाते. गोड पदार्थांना सुवास येण्यासाठी ,सुलभ पचन होण्यासाठी वेलदोडा वापरला जातो. तसेच पुलाव ,भाज्या ,कटाची आमटी यातही भूक वाढवणे, पचन करणे यासाठी वेलदोडा वापरतात.
२) स्थूल एला ( मोठी वेलची .. बडी ईलायची ) ही काळपट रंगाची व आकाराने मोठी असते.हिचे दाणे पण मोठे व खूपच उग्र वासाचे असतात. ही गुणाने उष्ण आहे. आपल्या गरम मसाल्यात हीच वेलची वापरतात. मात्र औषधात हीचा फारसा वापर होत नाही.
वेलदोडे ( सूक्ष्म एला) चवीला तिखट , गोड ,तीक्ष्ण असतात.पचल्यावर गोड रस निर्माण करतात. गुणाने थंड असतो.
गुण :——
१)वेलदोडा वात पित्त व कफ या तिन्ही दोषांवर कार्य करतो.
२) वेलदोडा तोंडाचा चिकटपणा , दुर्गंधी नाहीशी करतो. तहान कमी करतो. तोंडाला चव आणतो.
३) वेलदोड्याने भूक वाढते, पचन चांगले होते.
४) वेलदोडा सालासहित जाळून त्याचा कोळसा करतात.याला एला मषी म्हणतात. मळमळ होणे, पोटदुखी ,पोटफुगी यात ही मषी वापरतात. गर्भीणी अवस्थेत जी मळमळ होते ,यात पण ही मषी खडीसाखर व तूपात खलून द्यावी
५) खोकला ,दम लागणे या लक्षणात वेलदोडा तोंडात धरून चघळल्यास कफ बाहेर पडून बरे वाटते.
६)लहान बाळांना खोकला येत असेल तर वेलदोड्याची चिमूटभर पूड १ कप कोमट पाण्यात टाकून ते तासभर दडपून झाकून ठेवावे. नंतर गाळून बाळाला पिण्यासाठी वापरावे. याने खोकल्याची ढास कमी होते.
७) मूत्रप्रवृत्ती साफ होण्यासाठी , मूत्रदाह कमी करण्यासाठी वेलदोडा वापरावा.
८) तापात होणारा दाह पण वेलचीने कमी होतो.
९) आवळ्याच्या रसाबरोबर वेलची चूर्ण घेतल्यास हातापायाची जळजळ, अंगाची आग कमी होते.
१०) वेलची ,खजूर , मनुका मधात खलून चाटविल्यास खोकला, दम ,अशक्तपणा दूर होतो.
वेलची पाककृती :——
वेलची हलवा ——-
साहित्य :—- वेलची दाणे चार चमचे, बदाम १ वाटी , पिस्ता १ वाटी,खडीसाखर २ वाट्या, सायी सह दूध १ वाटी.
कृती:—- वेलची दाणे ,बदाम व पिस्ता यांची वेगवेगळी पूड करून घ्यावी.स्टीलच्या कढईत बदाम, पिस्ता,खडीसाखर व दूध एकत्र करून शिजत ठेवावे. त्याचा गोळा होत आला कि त्यात वेलची पूड घालून चांगले घोटून घ्यावे.गॅस बंद करावा. थंड झाल्यावर एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. १ चमचा रोज सकाळी खावे. थंडीत हा हलवा खावा. त्यामुळे शक्ती येते,डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळे सतेज होतात.
डॉ. नीलिमा हेमंत राजगुरु आयुर्वेदाचार्य मो. 9422761801. ई मेल – [email protected]