नाशिक – कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या जागतिक मोहिमेत आता नाशिक शहराची एंट्री झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलाबाबतच्या डिसेंबरमध्ये झालेल्या कराराअंतर्गत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या मोहिमेत नाशिक शहराचा प्रवेश झाल्याची घोषणा राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने गुरुवारी केली.कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण तठस्थ ठेवण्याच्या मोहिमेत देशातील महानगरांचा समावेश आहे. परंतु या मोहिमेत सहभागी होणारे आणि महानगर नसलेले नाशिक शहर हे देशातील पहिले शहर ठरले आहे. त्यानंतर राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, आणि औरंगाबाद या शहरांचा समावेश काही महिन्यात होणार आहे, अशी माहिती पर्यावरण विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
२०४० सालापर्यंत ‘नेट झीरो’ पर्यंत पोहोचण्यासाठी नाशिक शहराने नऊ वचने पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यामध्ये शहराचा संपूर्ण परिसराचा विकास करणे, शहरात लांबच्या ठिकाणी वाहनांवर जाऊन गरजा पूर्ण करण्याऐवजी चालत किंवा सायकलवर जाऊन अगदी घराजवळ त्यांच्या गरजा उपलब्ध करून देता याव्यात यासाठी प्रयत्न करणे यांचा समावेश आहे. पर्यावरण विभागाच्या निवेदनानुसार, २०३० सालापर्यंत कार्बन उत्सर्जन शून्य ठेवण्याचे उद्दिष्ट लागू करण्यासाठी नव्या बांधकाम प्रकल्प आणि इमारतींना नवे नियम लागू करून ते अनिवार्य करण्याचे नियोजन केले जाणार आहे. रेस टू झीरो उपक्रमांतर्गत शहरात आर्थिक सहाय्य कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत इमारती बांधकाम अधिनियमनांद्वारे नूतनीकरणयोग्य इमारतींचे कामे अनिवार्य करण्यात येणार आहे.
इतर वचनांमध्ये हवाप्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय परिसर हवा गुणवत्ता निकषांच्या पातळीपर्यंत शहरातील हवेचे प्रदूषण घटविण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. २०२५ पर्यंत शहरातील मोठ्या संस्था किंवा योगदान देणा-या व्यक्तीकडून उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. आगामी चार वर्षांमध्ये कार्बन उत्सर्जन शून्य करण्यासाठी उपयुक्त बससेवा देण्यासह स्वच्छ सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.
हवा आणि पाणी प्रदूषणाशी थेट संबंध असलेले आणि कार्बन उत्सर्जनासाठी कारणीभूत असलेल्या स्मशानभूमी आणि कचरा व्यवस्थापनात बदल करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या २०.५ कोटी रुपयांच्या अनुदानाचा उपयोग विद्युत दाहिनी उभारणे तसेच महापालिकेसाठी कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान उभारण्यासाठी करण्यात येणार आहे.
आगामी काळात चांगल्या सुविधा
रेस टू झीरो मोहिमेंतर्गत कार्बन तटस्थतेचे उद्दिष्ट साधण्यासाठी तसेच हवामान बदलाबाबत महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्याविरोधात लढताना आगामी काळात महापालिकेकडे चांगल्या सुविधा असतील.
– कैलास जाधव, महापालिका आयुक्त, नाशिक