मुंबई – आजच्या काळात केवळ तरुणांनाच नव्हे तर बहुतांश नागरिकांना आपल्याकडे एक स्वतःची चांगली कार असावी असे वाटते. परंतु आता आपण कार घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच आपल्याला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत कारण काही कार उत्पादक कंपन्यांनी कारच्या किमती वाढविल्या आहेत.
मारुती सुझुकी, ऑडी आणि मर्सिडीज-बेंझ इंडियाने भारतात त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांशिवाय इतर कंपन्याही येत्या काही दिवसांत किमती वाढवू शकतात. मारुती सुझुकीने गेल्या एका वर्षात विविध इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर विपरीत परिणाम झाला आहे.
१) मारुती सुझुकी
या कंपनीने वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ केली आहे. कंपनीने या वर्षी मार्च, जुलै आणि सप्टेंबरमध्ये दरवाढीची घोषणा केली होती. मारुती सुझुकीने अलीकडेच आपल्या व्हॅन इकोची किंमत 8 हजार रुपयांनी वाढवली आहे. इकोमध्ये एअरबॅग जोडल्यामुळे ही वाढ झाली आहे. तसेच, डिसेंबरमध्ये म्हणजे या महिन्यात त्यांच्या दोन उत्पादन ठिकाणी कच्चा मालाच्या कमतरतेमुळे सामान्य क्षमतेच्या सुमारे 80 टक्के होऊ शकते.
मर्सिडीज-बेंझ
जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ इंडियाने वैशिष्ट्य सुधारणा आणि वाढत्या किमती आटोक्यात आणण्यासाठी 1 जानेवारी 2022 पासून केवळ निवडक मॉडेल्सच्या किमती दोन टक्क्यांपर्यंत वाढवतील. तथापि, ज्या ग्राहकांनी त्यांच्या कारचे बुकिंग केले आहे आणि निवडक मॉडेल्ससाठी 4 महिन्यांहून अधिक काळ वाट पाहत आहेत त्यांना वाढलेले दर लागू होणार नाहीत. मात्र 2 टक्क्यांपर्यंतची ही वाढ दि.1 जानेवारी 2022 पासून लागू होईल.
याशिवाय, ए-क्लास, जीएलए आणि ई-क्लास सारख्या निवडक मॉडेल्ससाठी 31 डिसेंबर 2021 पर्यंत किंमत नेहमीचीच असेल. मर्सिडीज-बेंझ केवळ निवडक मॉडेल्सच्या एक्स-शोरूम किमतीत वाढ करेल. मात्र ज्या ग्राहकांनी GLE 400 आणि GLE 400d SUV चे बुकिंग केले आहे त्यांना डिलिव्हरी मिळण्यासाठी एप्रिलपासून वाट पाहावी लागत आहेत, त्यांना मात्र वाढलेल्या किमती लागू होणार नाहीत.
ऑडी
जर्मन लक्झरी कार निर्माता ऑडीने पुढील वर्षी म्हणजे दि. 1 जानेवारीपासून लागू होणार्या मॉडेल श्रेणीमध्ये 3 टक्क्यांपर्यंत दरवाढ जाहीर केली. इनपुट आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे कंपनीने दरवाढीचे कारण दिले आहे. तसेच ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमच्या निवडक वाहनांची नवीन किंमत श्रेणी ब्रँडची प्रीमियम किंमत निश्चित करेल, त्यामुळे ब्रँड आणि आमचे डीलर भागीदार दोघांचीही वाढ होईल. ते पुढे म्हणाले की, ग्राहकांवर सतत लक्ष केंद्रित करून, कंपनीने दरवाढीचा प्रभाव कमीत कमी असल्याची खात्री केली आहे.