नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशभरातील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सध्या वाहन विमा कंपन्या वेगवेगळ्या योजना बाजारात आणत आहेत. या योजना इतर कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आणि सोयींनी युक्त आहेत. त्यातच केंद्र सरकारने विमा क्षेत्रात नियम बदलले आहेत. त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. ‘यूज बेस इन्शुरन्स म्हणजेच पे एज यू ड्राईव्ह स्कीम या योजनेत वाहनधारकांना सवलत मिळणार आहे. या नव्या योजनेत वार्षिक विमा प्रिमिअम भरण्याची गरज पडत नाही. आपली कार किंवा अन्य वाहन जितके चालवाल तेवढाच हप्ता वाहनधारकांना द्यावा लागणार आहे.
आपला म्हणजे माणसांचा जीवन विमा असतो, त्याचप्रमाणे घर, वस्तू आणि वाहनांचा देखील विमा काढण्यात येतो. परंतु परंतु वैद्यकीय म्हणजे मेडिकल असो की वाहन विमा, त्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे आवश्यकच ठरते. विशेषतः वाहन विमाचे नूतनीकरण करण्यास अनेक वेळा अडचणी निर्माण होतात. दुचाकी तसेच चारचाकी वाहनांसाठी वाहन विमा आवश्यक मानला जातो, कारण वाहनाला अपघात झाल्यास, वाहन विमा संरक्षण नसल्यास संपूर्ण वाहनाचा खर्च आपल्यालाच करावा लागतो.
नवीन मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाचा विमा उतरवणे आवश्यक आहे. विना इन्शुरन्स भारतीय रस्त्यावर वाहन चालविल्यास दोन हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. तरीही बरेच जण वाहन दररोज किंवा नेहमी वापरत नाहीत, घरासमोर ते तसेच पडून असते, त्यामुळे नवीन वाहन विकत घेतल्यावर सुरुवातीच्या काळात विमा काढला जातो, कालांतराने मात्र विम्याचे नूतनीकरण होत नाही आणि कारण एक प्रकारे तो ग्राहकांना आर्थिक भुर्दंड वाटतो, परंतु यापुढे आपण जितका काळ वाहन चालवाल, तितकाच विमा भरण्याची योजना केंद्र सरकार आणत आहे. याला ‘यूज बेस इन्शुरन्स ‘ अथवा ‘पे एज यू ड्राईव्ह स्कीम ‘ असे म्हटले जाते. या योजनेमुळे निश्चितच वाहन चालकांना तथा वाहन मालकांना फायदा होणार आहे, असे दिसून येते.
सध्या पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून वाहन घेणारे विमा काढतात. पण हे आपल्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहे. तसेच वाहनांचा थर्ड पार्टी विमा हा अनिवार्य आहे. मात्र गरजेचे असूनही देशात ६० टक्क्यांहून अधिक वाहने ही विमा न काढता रस्त्यावर फिरत आहेत. बहुतांश वाहनधारक पॉलिसीचे नूतनीकरण करण्यास विसरतात. परंतु पॉलिसीचे वेळेवर नूतनीकरण न केल्यास त्यांना तोटा सहन करावा लागतो. वाढीव कालावधीदरम्यान पॉलिसीचे नूतनीकरण न केल्यास पॉलिसी रद्द होते.
आपल्या वाहनाला विम्याचे कवच नसते, तेव्हा एखाद्या अपघाताच्या वेळेस तुम्हाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते. सर्व वाहनांसाठी विविध प्रकारचा मोटार विमा दिला जातो. दुचाकी मोटार विम्यासाठी वेगळे नियम आहेत, तर चारचाकी मोटार विम्यासाठी वेगळे नियम आहेत. मोटार विम्याचे दोन प्रकार आहेत, पहिला थर्ड पार्टी विमा होय, दुसरीकडे, सर्वसमावेशक मोटार विम्याअंतर्गत, अपघातामुळे चालक, मालक आणि प्रवाशांच्या मृत्यू किंवा अपंगत्वावर विमा लाभ उपलब्ध आहेत. आता वाहन विमा मध्ये आणखी ही नवीन सुविधा उपलब्ध होणार असल्याने सर्वच वाहन चालकांना मोठा फायदा होणार आहे.
Car Insurance Premium New Scheme Benefits