इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पुणे-बंगळूरू या महामार्गावरून दररोज हजारो वाहने भरधाव वेगाने धावतात. या महामार्गावर गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर अपघात वाढले आहेत. महामार्गाच्या कडेला थांबलेल्या ट्रकवर इनोव्हा कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील संकेश्वर येथील प्रसिद्ध डॉक्टरांसह कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण दगावल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या भीषण अपघातात नेत्ररोग तज्ज्ञासह त्यांच्या पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला आहे. दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास हत्तरकीजवळील बेनकोळी गावाच्या परिसरात हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये ईनोव्हा कारचा चक्काचूर झाला. माल ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रस्त्यावरून वेगाने जाणारी वाहने काही काळ थांबली. त्यातील काही वाहनांमधील नागरिकांनी अपघात ग्रस्तांना मदतीचा हात दिला.
डॉ. सचिन मुरगुडे हे नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून परिचित होते. संकेश्वर येथे मुरगुडे यांचे नेत्र रुग्णालय आहे. त्यांची पत्नी श्वेता सुद्धा नेत्ररोग तज्ज्ञ होत्या. डॉ. सचिन, पत्नी डॉ. श्वेता आणि कन्या श्रेया हे इनोव्हा कारने बेळगावहून संकेश्वरला येत होते. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर हत्तरकी जवळ बेनकोळी गावानजिक असतानाच त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि त्यांची इनोव्हा कारने रस्त्याच्याकडेला थांबलेल्या मालवाहू कंटेनरवर जोरात धडक दिली. डॉ. सचिन शिवानंद मुरगुडे (वय ४५), डॉ. श्वेता सचिन मुरगुडे (वय ४२) आणि श्रेया सचिन मुरगुडे (वय ७) अशी मृतांची नावे आहेत. या दोन वाहनांची ही धडक इतकी भीषण होती की डॉ. श्वेता आणि श्रेया यांचा जागीच मृत्यू झाला, तर डॉ सचिन हे गंभीर जखमी झाले होत., मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाताची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.