नवी दिल्ली – पाकिस्तानी पत्रकार आरुसा आलम यांचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी कथित संबंध असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. आरुसा यांच्याशी मैत्री असल्याने पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यावर कॅप्टन यांनी पलटवार केला असून, आरुसा यांचे वेगवेगळ्या पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांसोबतचे फोटो ट्विट करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
कॅप्टन यांनी सोमवारी फेसबुकवर आरुसा आलम यांचे १४ फोटो शेअर केले. त्यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव, अमर सिंह, अश्विनी कुमार, यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, महेश भट्ट, श्याम सरन आणि माजी लष्करी अधिकारी जगजीत सिंह अरोरा यांच्यासह अनेक जण दिसत आहेत. फोटोंमधील प्रत्येक व्यक्तीचे पाक गुप्तचर संस्थेशी संबंध आहेत का? असा सवाल कॅप्टन अमरिंदर यांनी उपस्थित केला आहे. भारत आणि पाकिस्तानदरम्यान व्हिसा निर्बंध नसते तर आरुसा यांना पुन्हा भारतात आमंत्रित केले असते, असा दावा त्यांनी केला आहे.
कॅप्टन यांनी फेसबुक पोस्टवर लिहिले की, मी भारतातील विविध मान्यवर व्यक्तींचे पत्रकार आरुसा आलम यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आहे. हे सर्व मान्यवर आयएसआयचे एजंट आहेत, असे मला वाटते. असे बोलणार्यांनी बोलण्यापूर्वी विचार केला पाहिजे. येत्या मार्च महिन्यात मी ८० वर्षे तर आरुसा आलम ६९ वर्षांच्या होणार आहेत हा योगायोगच आहे.
तत्पूर्वी कॅप्टन यांनी सोनिया गांधी यांचा फोटोसुद्धा शेअर केला होता. कॅप्टनच्या मीडिया सल्लागाराने आरुसा आलम यांच्यासोबतचे सोनिया गांधी यांचे फोटो शेअर केले होते. त्यावर पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेसच्या पेजला टॅग केले आहे. गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनी आरुसा आलम यांचे आयएसआयशी संबंध असल्याच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच कॅप्टन आणि आरुसा आलम यांचे मैत्रीपूर्ण संबंध आयएसआयशी लिंक असल्याचा आरोप करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.