चंडीगढ – मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्याविरुद्ध शड्डू ठोकला असून, या लढाईत कोणतीही मर्यादा ओलांडू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष या नात्याने सिद्धू यांनी मला पक्षातून काढून टाकावे, असे थेट आव्हान कॅप्टन यांनी दिले आहे.
कॅप्टन यांच्या वक्तव्यावर सिद्धू यांची अद्याप कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. सिद्धू सध्या दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटायला गेले आहेत. सिद्धू यांना पंजाबचा मुख्यमंत्री म्हणून कदापी होऊ देणार नाही. आवश्यकता भासल्यास त्यांच्याविरुद्ध कोणत्याही किमतीत बळकट उमेदवार उभा करेन, असे कॅप्टन यांनी दोन दिवसांपूर्वीच आव्हान दिले होते. नवज्योत सिंग सिद्धू यांच्यामुळेच आपले पद गेले असून, त्यांना पक्षश्रेष्ठींनी पाठिंबा दिला आहे, असेच कॅप्टन मानत आहेत. सिद्धू यांच्यासह पक्षश्रेष्ठींविरुद्ध त्यांनी युद्धाचा बिगुल वाजविला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या मंत्रिमंडळाचे गठन करण्याबाबतचा तिढा अद्याप संपलेला नाही. कॅबिनेटच्या स्थापनेला अंतिम रूप देण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी २४ तासात दुसर्यांदा चन्नी यांना दिल्लीला बोलावले आहे. शुक्रवारी ते चंडीगड येथे पोहोचले आणि आदेश येताच सायंकाळी पुन्हा दिल्लीला गेले. २० सप्टेंबरला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गेल्या चार दिवसात चन्नी यांचा दिल्लीचा हा तिसरा दौरा आहे.
चन्नी यांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा, के. वेणुगोपाल आणि हरिश रावत यांच्यासोबत बैठक केली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी चंडीगढला परतल्यानंतर कॅबिनेटची घोषणा किंवा मंत्रिमंडळाची शपथ घेण्याबाबत घोषणा करतील असे वाटत असताना त्यांना पुन्हा दिल्लीला बोलावण्यात आले. अद्याप मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा घोळ अद्याप संपलेला नाही हे या घटनाक्रमांवरून स्पष्ट झाले.