नवी दिल्ली – पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या दिल्ली दौऱ्याला राजकीय चष्म्याने पाहिले गेले. परंतु राजकारणाच्या वरही पंजाबची सुरक्षा त्यांना चिंताक्रांत करत होती. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेण्याचा संपूर्ण अजेंडा याच्याशीच निगडित होता. या भेटीची संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. मात्र, पाकिस्तानकडून पंजाबमध्ये नव्याने अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची सविस्तर माहिती त्यांनी डोवाल यांना दिली आहे.
पाककडून फंडिंग
गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत घेतलेल्या भेटीदरम्यान कॅप्टन यांनी शेतकरी आंदोलनासह सुरक्षेबाबत चर्चा केली होती. उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार, अजित डोवाल यांच्या निवासस्थानी जवळपास अर्धा तासाच्या चर्चेत अमरिंदर सिंग यांनी पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये पाठविल्या जाणाऱ्या हत्यारांबाबत माहिती दिली. तसेच सरहद्दीवर अमली पदार्थांचा पुरवठा करून पाकिस्तान दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांना फंडिंग करण्याचा प्रयत्नही करत आहे.
सुरक्षा संस्थांना सतर्क व्हावे लागेल
पंजाब पोलिस आणि सीआयडी पाकिस्तानच्या विविध प्रयत्नांना कसे नाकाम करत होते याबाबतची माहिती अमरिंदर सिंग यांनी डोवाल यांना दिली. परंतु पंजाबमध्ये बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे पोलिसांचे हात बांधले जाऊ शकतात. त्यामुळे केंद्रीय सुरक्षा यंत्रणांना पाकिस्तानच्या नापाक कारवाया रोखण्यासाठी नेहमीच सतर्क राहावे लागेल. अमरिंदर सिंग यांच्या भेटीनंतर अजित डोवाल तत्काळ गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते.
पंजाबमध्ये ड्रोनद्वारे हत्यारे टाकली
खालिस्तानी दहशतवादी जनरेल सिंग भिंद्रनवाले याचा पुतण्या जसबीर सिंग रोडे याचा मुलगा गुरुमुख सिंग रोडे याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआय) २० ऑगस्ट रोजी अटक केली होती. एनआयने त्याच्या घरातून टिफीन बॉम्ब, पिस्तुलसह आरडीएक्स जप्त केले होते. हे हत्यारे आणि स्फोटके ड्रोनद्वारे पाकिस्तानात टाकण्यात आले होते, असे मानले जात आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका
खालिस्तानी दहशतवाद्यांकडून पंजाबमध्ये व्यापार्यांना धमक्या दिल्या प्रकरणी आणि खंडणी घेतल्याप्रकरणी एनआयएने एक जुलैला नऊ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याची हत्या केल्याच्या आरोपावरून एनआयएने खालिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद एक सत्य आहे. जर त्याविरोधात कठोर कारवाई केली गेली नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो, हेच अमरिंदर सिंग यांनी अजित डोभाल आणि अमित शहा यांना पटवून दिले आहे.