नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाची ३० एप्रिल २०२३ रोजी जाहीर झालेली निवडणूक भारत सरकारच्या संरक्षण विभागाने रद्द केली आहे. १७ मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार ही निवडणूक रद्द केली आहे. देवळालीसह देशभरातील ५६ कॅन्टोन्मेंट बोर्डात नगरसेवकासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असताना १७ फेब्रुवारी २०२३ च्या राजपत्राद्वारे पंचवार्षिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या त्यानुसार ३० एप्रिल रोजी मतदान होणार होते. त्याअनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असतानाच १७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संरक्षण विभागाचे संयुक्त सचिव राकेश मित्तल यांच्या आदेशानुसार भारत सरकारचे १७ फेब्रुवारी २०२३ चे राजपत्र रद्द करण्याबाबत सूचना देऊन निवडणुका रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
कॅन्टोन्मेंट मनपात जाण्याची शक्यता
देशभरातील कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश लगतच्या महानगरपालिका अथवा नगरपरिषदांमध्ये करणेबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू झाली होती.दरम्यान निवडणुका जाहीर झाल्याने ही कार्यवाही मागे पडत असल्याचे बघून कॅन्टोन्मेंट विकास मंचच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निवडणुका रद्द करून लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे विलीनीकरण करण्याबाबत मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षण मंत्रालयाकडून निवडणुका रद्द करण्यात आल्याची अधिसूचना १७ मार्च रोजी काढण्यात आली.त्यामुळे पुढील निवडणुका कशा व कधी होतात हे पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.
Cantonment Board Soon Merge in Municipal Corporations Election Cancelled