इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगभरात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मृत्यू कॅन्सरमुळे होतात. अमेरिकन शास्त्रज्ञांनी कॅन्सरविषयी आणखी एक नवीन शोध आता लावला आहे. त्यानुसार कॅन्सरच्या पेशी इतर पेशींच्या विघटन आणि चरबी आणि प्रथिने पचवण्याची क्षमता बिघडवतात. हे मिथाइल मॅलोनिक ऍसिड (MMA) चे स्तर वाढवते. यातून मेटास्टॅसिसच्या प्रक्रियेस गती मिळते.
मेटास्टॅसिस म्हणजे कॅन्सरचे इतर अवयवांमध्ये पसरणे. फक्त या एका प्रक्रियेमुळे ९० टक्के कॅन्सर रुग्णांचा मृत्यू होतो. न्यूयॉर्कमधील वेल कॉर्नेल मेडिकल इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी केलेला हा शोध जर्नल नेचर मेटाबॉलिझममध्ये प्रकाशित झाला आहे. यानुसार, मेटास्टॅटिक ट्यूमर कॅन्सर रूग्णांच्या प्रोपियोनेट चयापचयातील विशिष्ट एंजाइमच्या क्रियाकलापांवर मर्यादा घालतात. प्रोपियोनेट चयापचय ही प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपले शरीर चरबी आणि प्रथिने पचवते. जेव्हा एंजाइम त्यांचे कार्य योग्यरित्या करू शकत नाहीत, तेव्हा MMA चे उत्पादन वाढू लागते. हे ऍसिड कर्करोगाच्या पेशी अधिक आक्रमक बनवते. जगभरात कॅन्सर हा वेगाने फोफावणारा आजार असून वेगवेगळ्या संशोधनांमधून त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे संशोधनदेखील त्याचाच भाग असल्याचं सांगितलं जात आहे.
रुग्णाला वाचवणे कठीण
अभ्यासात सहभागी डॉ. जॉन ब्लॅनिस यांच्या म्हणण्यानुसार, एकदा कर्करोगाच्या गाठीतून मेटास्टेसिस प्रक्रिया सुरू झाली की, रुग्णाला वाचवणे कठीण होते. कर्करोगाच्या गाठी मेटास्टॅटिक ट्यूमर कशा बनवतात याचे विज्ञान फारसे ज्ञात नाही. या नवीन शोधामुळे इतर पेशींमध्ये कॅन्सरच्या गाठीच्या मेटास्टॅसिसची प्रक्रिया समजून घेण्यास मदत होईल. नवीन मार्ग आणि उपचार शोधण्यात मदत होईल. हे स्तनाच्या कॅन्सरसह इतर अनेक कॅन्सरच्या पेशींचे विश्लेषण करण्यात मदत करेल.