नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक आणि ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यात १ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत कॅन्सर रुग्ण शोध मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामीण भागात तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग यांची मोफत तपासणी करण्यासाठी सुसज्ज कॅन्सर डायग्नोसिस व्हॅनचा उपयोग केला जाईल.
ही व्हॅन अत्याधुनिक सुविधांनी युक्त आहे. यामध्ये मुखरोग तपासणीसाठी दंत चिकित्सक, डेंटल चेअर, तपासणी साधने, स्टरलायझर, रेफ्रिजरेटर, सॉफ्टवेअरसह लॅपटॉप, पाणी आणि वीज सुविधा उपलब्ध आहेत. तसेच, स्तनाचा कर्करोग तपासणीसाठी स्त्रीरोग तज्ञ, स्टाफ नर्स, स्वतंत्र कक्ष आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग तपासणीसाठी स्वतंत्र बेड व कोलकोस्कॉपी यंत्रणा आहे. शहरातील मोठ्या रुग्णालयांप्रमाणे या व्हॅनमध्ये सर्व आवश्यक तपासणी यंत्रणा उपलब्ध आहे.
यापूर्वी ९ फेब्रुवारी ते ३० जून २०२५ या कालावधीत ७,२७७ शिबिरांमधून १०,०४,१९१ लोकांची तपासणी झाली, ज्यामध्ये ९२८ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ७० जणांमध्ये कॅन्सरची लक्षणे दिसली, २३ रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार झाले, तर ४७ जणांना संदर्भ सेवा देण्यात आल्या.
नागरिकांना आवाहन आहे की, तोंडात लाल-पांढरे चट्टे, बरी न होणारी जखम, आवाजातील बदल, पाळीव्यतिरिक्त रक्तस्त्राव, स्तनात गाठ किंवा आकारात बदल यांसारखी लक्षणे आढळल्यास नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयात व्हॅनच्या भेटीची वेळ घेऊन तपासणी करावी. ही तपासणी मोफत असून, कॅन्सरबाबत गैरसमज दूर करणे आणि लवकर निदानाद्वारे उपचार सुरू करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल, उपसंचालक डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. राहुल हडपे आणि एनसीडी विभागप्रमुख डॉ. बांगर यांनी नागरिकांना या मोहिमेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
shaymugale74@gmail.com