नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – परवडणाऱ्या किमतीत औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेनुसार, राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए), 28.10.2024 रोजी जारी केलेल्या एका कार्यालयीन निवेदनाद्वारे, संबंधित उत्पादकांना ट्रास्टुझुमॅब, ओसिमरटिनिब आणि दुर्वालुमॅब या कर्करोगावरच्या तीन औषधांच्या कमाल किरकोळ किमती कमी करण्याचे निर्देश दिले होते. 2024-25 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या कर्करोगविरोधी तीन औषधांना सीमा शुल्कातून सूट देण्याच्या घोषणेच्या अनुषंगाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. महसूल विभाग, वित्त मंत्रालयाने दिनांक 23.07.2024 रोजी, अधिसूचना क्रमांक 30/2024 जारी केली आणि या तीन कर्करोगविरोधी औषधांवर लावण्यात येणारे सीमा शुल्क शून्यावर आणले आहे.
याशिवाय, महसूल विभाग, वित्त मंत्रालयाने अधिसूचना क्र. 05/2024 दिनांक 08.10.2024 रोजी जारी करुन या तीन औषधांवर 10.10.2024 पासून वस्तू आणि सेवा कराचा दर 12% वरून 5% पर्यंत कमी करण्याची सूचना दिली आहे.
त्यानुसार, बाजारात या औषधांच्या कमाल किरकोळ किमतींमध्ये (एमआरपी) कपात झाली पाहिजे तसेच घटवलेले कर आणि सीमा शुल्क यांचे फायदे ग्राहकांना दिले जावेत. म्हणूनच, राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (एनपीपीए) 28.10.2024 रोजी जारी केलेल्या कार्यालयीन निवेदनाद्वारे, वरील औषधांच्या सर्व उत्पादकांना या औषधांच्या एमआरपी कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. औषध उत्पादकांनी डीलर्स, राज्य औषध नियंत्रक आणि सरकार यांना हे बदल दर्शविणारी किंमत सूची किंवा पूरक किंमत सूची जारी करणे आवश्यक आहे तसेच फॉर्म-II/ फॉर्म V द्वारे किंमतीतील बदलाची माहिती राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाला (एनपीपीए) सादर करणे देखील आवश्यक आहे.