नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेत कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सीबीएसईची १२ वीची परीक्षा रद्द करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
एका वकिलांनी याचिका दाखल केली असून, निर्धारित वेळेपूर्वी १२ वीच्या परीक्षेसाठी वस्तूनिष्ठ पद्धतीवर आधारित निकालांची घोषणा केली जावी, अशी मागणी केली आहे.
कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे १२ वी बोर्डाची परीक्षा घेणे शक्य नाही. महामारीमुळे ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष पद्धतीने परीक्षा घेणे शक्य नाही. निकाल उशिराने घोषित होण्यामुळे परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते, असे याचिकेत म्हटले आहे.
वकील ममता शर्मा यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेत केंद्र सरकार, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एग्झामिनेशन या संस्थांना प्रतिवादी करण्यात आले आहे. महामारीमुळे विद्यार्थी आणि पालकांच्या एका मोठ्या गटाकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर १२ वीची बोर्डाची परीक्षेसंदर्भात बोर्डाने अद्याप कोणताच निर्णय घेतला नसल्याचे सीबीएसईने शुक्रवारी सांगितले.