विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकने कोविड पीडित आणि त्यांच्यावर उपचार करणार्या रुग्णालय आणि नर्सिंग होमना ५० कोटी रुपयांपर्यंत स्वस्त कर्ज देण्याची घोषणा केली आहे. बँकेकडून तीन नव्या कर्जांचे उत्पादन लाँच करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोरोनाशी झगडणार्या रुग्णांसाठी, रुग्णालये, नर्सिंग होम आणि इतर आरोग्य सेवा देणार्या संस्थांसाठी आणि कोरोनामुळे डबघाईस आलेल्या लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) कर्जपुरवठा करण्यात येईल.
रुग्णालयांसाठी कॅनरा वैद्यकीय माध्यमातून हेल्थकेअर क्रेडिटची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, नर्सिंग होम आणि डॉक्टर तसेच परीक्षण केंद्रांना १० लाख रुपयांपासून ५० कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. व्याजात दिलासा देण्यासोबत कर्जाचा काळ १० वर्षांपर्यंत असेल. त्यामध्ये १८ महिन्यांचा मोरेटोरियम कालावधीचाही समावेश आहे.
नोंदणीकृत रुग्णालयांना वैद्यकीय ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करणार्या किंवा कॉन्सन्ट्रेटरचा व्यवसाय करणार्या व्यावसायिकांना कॅनरा जीवनरेखा वर्गीकरणात कमी व्याजदरात दोन कोटींचा कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनांच्या कर्जावर कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही.
या दोन्ही वर्गाअंतर्गत कर्ज घेण्याची मुदत पुढील वर्षाच्या ३१ मार्चपर्यंत असेल. कॅनरा सुरक्षेअंतर्गत बँकेकडून तिसर्या वर्गात कोरोनाशी लढणार्या रुग्णांना उपचारासाठी वैयक्तिक कर्ज पुरवठा केला जाईल. हे कर्ज रुग्णालयात उपचार सुरू झाल्यापासून डिस्चार्ज होईपर्यंत २५००० रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत असेल. ३० सप्टेंबरपर्यंत कर्ज घेण्याची मुदत असेल.