इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कॅनरा बँकेच्या खातेदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कॅनरा बँकेने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. जे खातेदार बँकेत पैसे जमा करतात किंवा ठेवणार आहेत त्यांना याचा फायदा होईल. सुधारित व्याजदर १ मार्च २०२२पासून लागू करण्यात आले आहेत. बँकेने वेगवेगळ्या मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात एक चतुर्थांश टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. एक वर्षाच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५.१ टक्के तर एक किंवा दोन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर ५ टक्क्यांवरून ५.१५ टक्के करण्यात आला आहे. २ ते ३ वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज दर ५.२० टक्के आणि ३ ते ५ वर्षांच्या ठेवींसाठी ५.२५ टक्क्यांवरून ५.४५ टक्के करण्यात आला आहे, असे बँकेच्या निवेदनात म्हटले आहे.
बँकेच्या निवेदनानुसार, ५ ते १० वर्षांच्या मुदत ठेवींवर जास्तीत जास्त ०.२५ टक्के वाढ करून व्याजदर ५.५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना सर्व मुदत ठेवींवर ०.५० टक्के किंवा अर्धा टक्के अधिक व्याज मिळणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात व्याजदरांमध्ये घटच होत होती. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करतानाही पुरेसा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे ही बातमी कॅनरा बँकेच्या खातेदारांसाठी, गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी ठरली आहे.