विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
उंटांच्या अँटीबॉडीपासून कोरोनाचे उपचार शक्य असल्याची बाब एका अभ्यासात समोर आली आहे. यावर सध्या संशोधन सुरू असून ते योग्य दिशेने सुरू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उंटांमध्ये कोरोना विषाणूला मात देण्याची क्षमता असल्याचे यूएईच्या एका प्रसिद्ध सूक्ष्मजीवशास्त्राच्या डॉक्टरांचा दावा आहे. उंटांद्वारे कोरोनारुग्णांना बरे केले जाऊ शकते.
रिसेप्टर पेशींमुळे संसर्ग
उंटांमध्ये विषाणू रिसेप्टर पेशी नसतात, त्यामुळे त्यांच्यावर कोरोनाचा कोणताच परिणाम होत नाही, असे यूएईच्या माध्यमांमध्ये म्हटले आहे. माणूस आणि इतर प्राण्यांमध्ये रिसेप्टर पेशी असतात. रिसेप्टर पेशींमुळेच माणसांमध्ये विषाणूचा प्रसार होत आहे. त्यांच्या म्युकोसा पेशीमध्ये विषाणू चिकटू शकत नाही. त्यामुळे कोरोनाविरोधात उंट एक महत्त्वाचा उपचार सिद्ध होऊ शकतो, असे डॉक्टरांचा दावा आहे.
त्या उंटांवर परिणाम नाही
कोरोनापासून बचावासाठी यूएईमध्ये उंच पाठ असलेल्या उंटांवर संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनात उंटांना कोरोनाच्या मृत नमुन्यांचे इंजेक्शन दिले जाते. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल होत आहेत यावर अगदी बारकाईने लक्ष दिले जात आहे. अँटीबॉडीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. त्या रक्ताची चाचणी केली जात आहे. उंच पाठ असलेल्या उंटांवर कोरोनाचा काहीच परिणाम झाला नाही, असे सध्याच्या संशोधनातून निष्पन्न होत आहे.