इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज स्थानिक केबल ऑपरेटर (एलसीओ) नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम, 1994 मध्ये सुधारणेबाबत अधिसूचना जारी केली आहे. आजपासून प्रभावी, एलसीओ नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन केली जाईल आणि मंत्रालयाकडे नोंदणीचे अधिकार असतील.
अर्जदाराच्या आधार, पॅन, सीआयएन, डीआयएन इत्यादी तपशीलांची यशस्वी पडताळणी केल्यावर, एलसीओ नोंदणी प्रमाणपत्रे वास्तविक वेळेत जारी केली जातील. तसेच, एलसीओ नोंदणीसाठी नोंदणी किंवा नूतनीकरण नाकारल्याविरोधात अपील करण्याची तरतूद समाविष्ट करण्यात आली आहे.
याआधी एलसीओ नोंदणी प्रक्रिया, एलसीओ कार्यालय क्षेत्रातील स्थानिक मुख्य टपाल कार्यालयात ऑफलाईन मोडमध्ये केली जात होती ज्यामध्ये मुख्य पोस्टमास्टरांकडे नोंदणीचे अधिकार होते. मॅन्युअल नोंदणी प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ होती. तसेच, नोंदणी मिळाल्यावर कामकाजाचे क्षेत्र विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित होते.
एलसीओ नोंदणीच्या संदर्भात सुधारित नियमांची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
एलसीओ ला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर (www.new.broadcastseva.gov.in) नवीन नोंदणीसाठी किंवा नोंदणीचे नूतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन जारी केले जाईल.
एलसीओ नोंदणी पाच वर्षांच्या कालावधीसाठी प्रदान किंवा नूतनीकरण केली जाईल;
नोंदणी किंवा नूतनीकरणासाठी प्रक्रिया शुल्क केवळ पाच हजार रुपये आहे;
एलसीओ नोंदणी संपूर्ण भारतात परिचालनासाठी वैध असेल;
नोंदणीच्या नूतनीकरणासाठी अर्ज नोंदणी संपण्याच्या किमान 90 दिवस आधी केलेला असावा
नोंदणी प्राधिकरणाच्या म्हणजेच नियुक्त विभाग अधिकारी द्वारा नोंदणी किंवा नोंदणीचे नूतनीकरण नाकारल्याच्या निर्णयाविरुद्ध एलसीओ अपील प्राधिकरण म्हणजे अवर सेक्रेटरी (डीएएस) समोर 30 दिवसांच्या आत अपील करू शकतात.
विद्यमान एलसीओ नोंदणी ही नोंदणी प्रमाणपत्रात नमूद केलेल्या कालावधीसाठी वैध राहील. जर एलसीओची विद्यमान नोंदणी 90 दिवसांपेक्षा कमी कालावधीसाठी वैध असेल तर नूतनीकरणासाठी अर्ज, असल्यास , पोर्टलवर त्वरित करावा लागेल.
नोंदणी प्रदान करणे /नूतनीकरणासाठी टपाल कार्यालयाकडे केलेले अर्ज, जे आजच्या तारखेपर्यंत प्रलंबित आहेत, ते मागे घ्यावे लागतील आणि पोर्टलवर अर्ज करावे लागतील.
कोणत्याही मदतीची आवश्यकता असल्यास, पोर्टलवर उपलब्ध असलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा lco.das[at]gov[dot]in वर ईमेल पाठवावा.
नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया व्यवसाय सुलभतेच्या सरकारच्या वचनबद्धतेशी सुसंगत असून अर्जदारांच्या तपशीलांची ऑनलाईन यशस्वी पडताळणी केल्यानंतर नोंदणी/नूतनीकरण प्रमाणपत्र वास्तविक वेळेत तयार केले जाईल.