इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकचे ग्रामविकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे. एका कंत्राटदाराच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणात ईश्वरप्पा यांचे आरोपी म्हणून नाव आल्यानंतर तीन दिवसांनी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भारतीय जनता पक्षाला पेचातून वाचवण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. राजीनामा देण्यासाठी ईश्वरप्पा आपल्या समर्थकांसह शिवमोगा येथून बंगळुरूला गेले. पाटील यांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या चौकशीतून आपली निर्दोष मुक्तता होईल, असा विश्वास ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला.
उडुपी येथील एका लॉजमध्ये कंत्राटदार संतोष पाटील यांचा मंगळवारी (१२ एप्रिल) मृतदेह आढळला होता. पाटील यांनी विष प्राशन केल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आत्महत्येचे प्रकरण समजून पोलिस तपास करत आहेत. कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगावातील हिंडाल्गा गावातील रस्ते निर्माणाचे ४ कोटी रुपये थकवल्याचा आरोप पाटील यांनी मृत्यूपूर्वी केला होता. ४ कोटी रुपये पेमेंट करण्यासाठी त्यांच्याकडे ४० टक्के कमिशन मागण्यात आले होते, असा आरोपही पाटील यांनी केला होता. मृत्यूनंतर कुटुंबीयांना कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये, अशी विनंती पाटील यांनी केली होती.
मुख्यमंत्री बोम्मई हे ईश्वरप्पा यांना वाचवत असल्याचा आरोप कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्यासाठी हा विरोध नसून, भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात आहे, असेही ते म्हणाले. त्यावर पाटील यांच्या मृत्यू प्रकरणात विरोधी पक्षाच्या नेत्यांना तपास अधिकारी, फिर्यादी आणि न्यायाधीश बनण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले आहे. तर ईश्वरप्पा हे निर्दोष ठरतील आणि लवकरच मंत्रिमंडळात परततील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केला आहे.