मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर दररोजचे दौरे, सभा, कार्यक्रम यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला असून तूर्तास सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यातच सत्ता स्थापन होऊन एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीय. तो नक्की कधी होईल, याबाबत अनिश्चितताच आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण जाली आहे. त्याची दखल बंडखोर गटाने नेतृत्व करणारे तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यासाठीच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यापासून अनेक वेगवेगळ्या बैठका सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि त्यांचे दिल्ली दौरेदेखील सतत सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी विदर्भ मराठवाडा दौराही केला होता. यासोबतच उद्धाटनाचे कार्यक्रम, सत्कार समारंभ, जाहीर सभादेखील सातत्याने सुरू आहेत. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला असून, त्यांना थकवा जाणवत असल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार होता. पण मुख्यमंत्री शिंदेची प्रकृती बिघडल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लांबत चाललेल्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे आता भाजप आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. हे ओळखत शिंदे गटातील ५० आमदारांची बैठक बोलावली आहे. आज सायंकाळी ६ वाजता नंदनवन या निवासस्थानी बैठक होणार आहे. आमदारांनी काही काळ संयम ठेवावा असे आवाहन या बैठकीत केले जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर ६ तारखेला भगतसिंह कोश्यारी दिल्ली जाणार आहेत. त्यानंतर सोमवार किंवा मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होईल असे दिसून येत आहे. तर ८ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात राज्यातील राजकीय पेचावर सुनावणी होणार आहे.
Cabinet Expansion uncertainty Shivsena Rebel MLA CM Eknath Shinde Decision