नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत खासगी एफ. एम. रेडिओ विषयीच्या तिसऱ्या टप्प्यातील धोरणाअंतर्गत, 784.87 कोटी रुपयांच्या अंदाजित राखीव मूल्यासह, 234 नवीन शहरांमधील 730 वाहिन्यांकरता चढत्या दराच्या ई – लिलावाची तिसरी फेरी आयोजित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली.
या प्रस्तावित लिलावांसाठीची शहरे / नगरांची राज्यनिहाय यादी तसेच नवीन लिलावासाठी मंजूर खाजगी एफ. एम. वाहिन्यांची संख्या खाली परिशिष्ट म्हणून जोडली आहे.खाजगी एफ. एम. वाहिन्यांसाठी वार्षिक परवाना शुल्कापोटी (ALF), वस्तू आणि सेवा कर (GST) वगळून, सकल महसुलाच्या 4% रक्कम शुल्क म्हणून आकारली जावी, या प्रस्तावाला देखील मंत्रिमंडळाने या बैठकीत मंजुरी दिली. हे वार्षिक परवाना शुल्क 234 नवीन शहरे / नगरांसाठी लागू असणार आहे.
या 234 नवी शहरे / नगरांमध्ये सुरु होणाऱ्या खाजगी एफ. एम. रेडिओ वाहिन्यांमुळे, अद्यापही खाजगी एफ. एम. रेडिओ वाहन्यांची सेवा उपलब्ध नसलेल्या शहरांची / नगरांची एफएम रेडिओ वाहिन्यांची आजवर पूर्ण न होऊ शकलेली मागणी, पूर्ण करता येणार आहे. यासोबतच यामुळे त्या त्या प्रदेशातील मातृभाषेमधून नव्या धाटणीची / स्थानिक पातळीवरील आशय निर्मिती देखील होऊ शकणार आहे.
या नव्या खाजगी एफ. एम. वाहिन्या सुरू झाल्याने रोजगाराच्या नव्या संधी देखी निर्माण होतील, त्यासोबतच स्थानिक बोली भाषा आणि संस्कृतीला तसेच ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमालाही चालना मिळू शकणार आहे.
या नव्या खाजगी एफ. एम. वाहिन्या ज्या नव्या शहरांमध्ये / नगरांमध्ये सुरू होणार आहेत, त्यांपैकी बरीचशी शहरे / नगरे ही आकांक्षीत जिल्ह्यांमधील तसेच जिल्हे आणि डाव्या कट्टरपंथीयांच्या प्रभावाखालच्या भागांमधील आहेत. अशा भागांमध्ये या नव्या खाजगी एफ.एम. वाहिन्या सुरू झाल्याने, त्या त्या प्रदेशातील सरकारच्या संपर्काच्या व्याप्तीचा अधिक विस्तार आणि सक्षमीकरण होण्यालाही मदत मिळणार आहे.