शैक्षणिक क्रांती घडविणाऱ्या
बायज्यूज या स्टार्टअपची
अशी आहे रोमांचक यशोगाथा
त्याला अभ्यासात विशेष रस नव्हता. खेळायला खुप आवडायचे. इंजिनीअर होऊन नोकरीही केली. पण, एका घटनेने त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली अन तो आज जगातील यशस्वी उद्योजकांपैकी एक बनला आहे. कॅटच्या प्रवेश परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवूनही एमबीएला प्रवेश न घेणारा पण अनेक एमबीए घडविणारा तसेच बायज्यूज या अॅपद्वारे शिक्षण क्षेत्रात क्रांती करणाऱ्या या अवलियाची ही रोमांचक यशोगाथा…
“खेड्यात जन्म होणे, ही बाब काही जणांना जरी खेदजनक वाटत असले तरी हीच बाब माझ्यासाठी सगळ्यात मोठी जमेची बाजू ठरली, कारण खेड्यातून येणार्या मुलांमध्ये एक वेगळाच स्पार्क असतो. एक वेगळीच जिद्द असते, कदाचित इतर शहरातील मुलांपेक्षा आम्ही मागे आहोत आणि ही कमी भरून काढण्यासाठी आम्हाला जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, अशी भावना कुठेतरी मनात खोलवर रुजलेली असते. त्यामुळे आमचा प्रत्येक प्रयत्न संपूर्ण ताकद एकवटून करणं व त्यात आपलं सर्वस्व झोकून देणं इतकंच आम्हाला ठाऊक असतं.” हे उद्गार आहेत अतिशय कमी कालावधीत जगप्रसिद्ध व यशस्वी झालेल्या एका तरुण उद्योजकाचे, ज्याने केवळ आपल्या बुद्धिमत्ता व चिकाटी च्या जोरावर अवघ्या २ लाखाचा बिझनेस काही शेकडो करोडचा केलाय. फारच कमी कंपन्या इतक्या कमी अवधी मध्ये एवढी उंची गाठू शकतात.
त्या तरुणाचं नाव आहे बायजू रविंद्रन. हे नाव आज देशातील जवळपास सर्वांनाच माहिती झाले आहे. अझिकोड हे केरळच्या किनारपट्टीवरचं खेडं. या गावात रविंद्रन (फिजिक्सचे शिक्षक) व त्यांच्या पत्नी शोभनावल्ली (गणिताच्या शिक्षिका) असे हे दाम्पत्य राहत होते. या दाम्पत्याला दोन मुलं. मोठ्याचं नाव बायजू आणि धाकट्याचं रिजू. हे दाम्पत्य शिक्षण क्षेत्रात असूनही आपल्या मुलांनी केवळ पुस्तकी शिक्षणात अग्रेसर असावं, असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं. त्यांनी नेहमीच आपल्या मुलांना त्यांच्या आवडीच्या वाटा शोधण्यासाठी प्रवृत्त केलं. खरंतर मुलांना जितकं स्वातंत्र्य द्याल, तितकंच त्यांना जबाबदारीचे भान येतं, असं त्यांचं मत होतं.
बायजूला लहानपणापासूनच अभ्यासात विशेष रस नव्हता. त्याचे आवडीचे दोनच विषय, एक म्हणजे क्रीडा आणि दुसरा म्हणजे गणित. त्यातही खेळात त्याची विशेष रुची. केवळ खेळासाठी त्याने अनेकदा शाळा बुडवली. इयत्ता आठवी नंतर तर त्याची उपस्थिती ५० टक्क्यांहून कमी असायची. आई-वडिल त्याच शाळेत शिक्षक असूनही त्याचे असे वर्तन पाहून लोकांना आश्चर्य वाटे. पण त्याच्या आई-वडिलांना मात्र यात काहीही गैर वाटत नव्हतं. त्यांच्या मते सर्वांगिण विकासासाठी खेळ तितकाच महत्वाचा आहे जितकं अभ्यास करणं. फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन अशा अनेक खेळात त्याने प्राविण्य मिळवले होते. पुढे जाऊन त्याने तीन खेळात विद्यापीठ स्तरापर्यंत मजल मारली. पण इतकं असूनही खेळात आपलं करिअर करायचं नाही, हे मात्र त्याचं नक्की होतं.
सतत खेळात असूनही बायजूचे मार्क्स सरासरीपेक्षा चांगलेच असायचे. त्याने तर चक्क मॅथ्स ऑलिम्पियाडची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. याचं कारण असं की, खेळात जास्त वेळ घालवल्याने कमी वेळेत जास्त अभ्यास बायजूला करावा लागत होता. आणि त्यामुळे त्याने अभ्यास करण्याच्या अशा नवनवीन पद्धती शोधून काढल्या होत्या. ज्यामुळे कमी वेळेत जास्त अभ्यास व्हायचा व तोही दीर्घकाळ लक्षात राहायचा. याच सवयीचा फायदा त्याला आपल्या व्यवसायात झाला. आज बायजुज् लर्निंग ॲप हे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे.
बारावीपर्यंतच्या शिक्षणानंतर पुढे काय असा प्रश्न त्याच्यासमोर होता, पण त्या काळातील सर्व विद्यार्थ्यांसमोर केवळ दोनच पर्याय होते इंजिनीअरिंग किंवा मेडिकल. अर्थात यात निवड करण्यासाठी बायजूला फार वेळ लागला नाही. त्याचा निकष अगदी सोपा होता. ज्या क्षेत्रात गेल्यावर मला खेळण्यासाठी जास्त वेळ मिळेल ते करिअर मी निवडेल. आणि म्हणूनच त्यांने इंजिनीअरिंगची निवड केली. केरळातील कन्नूर येथील गव्हर्नमेंट इंजिनीअरिंग कॉलेज मधून बी टेक ही पदवी त्याने संपादन केली. इंजिनीअरिंग करत असताना देखील त्याने खेळाला योग्य तो न्याय दिला. इंजिनीअरिंग पूर्ण झाल्यानंतर त्याला लगेच एका शिपिंग कंपनीमध्ये चांगली नोकरी मिळाली. या नोकरीच्या निमित्ताने बायजूला अनेक देशात प्रवास करण्याची संधी मिळाली. नोकरी आणि रूटीनमध्ये बायजू समाधानी होता. घरचेही आनंदात होते. म्हणता म्हणता नोकरीत दोन वर्षे उलटली आणि असं असताना एक घटना घडली.
एकदा सुट्टीवर असताना बायजू काही काळ आपल्या मित्रांसोबत बेंगळुरू येथे होता. त्याचे मित्र एमबीएच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होते. बायजूचे गणित चांगले असल्याने त्यांनी बायजूला गणित शिकवण्याची विनंती केली आणि बायजूने ही ती हसत हसत स्वीकारली. एका मित्राच्या टेरेसवरच या मित्रांची गणिताची शाळा सुरू झाली. बायजू कडून सर्वजण गणिताच्या शॉर्ट ट्रिक्स शिकत होते. बायजूची बुद्धीमत्ता पाहून त्याच्या मित्रांनी त्याला देखील या प्रवेश परीक्षेचा अर्ज भरण्यास सांगितले. त्याने ती परीक्षा दिली सुद्धा. थोड्याच दिवसात निकाल आला. आणि निकाल ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. बायजूला शंभर पर्सेंटाइल मार्क्स मिळाले होते. आणि त्याच्या सर्व मित्रांनाही अपेक्षित असलेल्या आयआयएममध्ये प्रवेश मिळाला होता. हे सर्व फळ बायजूच्या शिकवण्याचे होते. सर्वोत्कृष्ट मार्क्स मिळवूनही बायजूने एमबीएला प्रवेश घेतला नाही.
स्वतःवरच विश्वास न बसून बायजूने ही एमबीएची कॅट प्रवेश परीक्षा पुन्हा द्यायचे ठरवले. आणि पुन्हा निकालही तोच आला. पुन्हा शंभर पर्सेंटाइल आणि पुन्हा बायजूने प्रवेश घेतला नाही. पहिल्या बॅचचा रिझल्ट ऐकून अनेक जण बायजूकडे क्लाससाठी विचारणा करू लागले. बायजूनेही आता विकेंडला बॅच घ्यायचं ठरवलं. या बॅचला ३५ विद्यार्थी जमले. पहिली बॅच टेरेसवर, दुसरी बॅच एका रूम मध्ये, तिसरी क्लास रूम मध्ये आणि असं करत करत सहावी बॅच बायजूला बाराशे विद्यार्थ्यांची एका मोठ्या नाट्यमंदिरात घ्यावी लागली. हे सर्वही अगदी नाट्यमय पद्धतीने घडत होतं. आपल्या शिकवण्याबद्दल स्वतःलाच विश्वास वाटू लागल्यावर त्याने नोकरी सोडण्याचा निर्णय आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यांनी ही तो हसत हसत स्विकारला. आपल्या मुलांच्या पाठीमागे उभे राहण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.
आता बायजूचे क्लास केवळ बेंगळुरू पुरतेच मर्यादित नव्हते, तर चेन्नई, मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद अशा अनेक शहरांमध्ये बायजूची प्रसिद्धी वाढत होती. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजेसमध्ये देखिल बायजूचे वर्कशॉप्स घडवून आणले. बायजूची प्रसिद्धी इतकी वाढत होती की, त्याला कुठल्याही क्लासरुमचे बंधन राहिले नव्हते. अनेक शहरांमध्ये बायजूने चक्क स्टेडियममध्ये गणिताचे क्लास घेतले आहेत. दिल्लीतील सर्वात मोठ्या स्टेडिअममध्ये साधारण २४ हजार विद्यार्थी एका वेळेला बायजूकडून गणिताचे धडे घेत होते. या सर्व प्रवासात बायजू एका पाठोपाठ एक असे अनेक यशोशिखर गाठत होता. सलग ३ वर्षे न थांबता, न सुट्टी घेता तो अनेक शहरात प्रवास करून गणिताचे क्लास घेत होता. प्रचंड मेहनत करत होता आणि त्या मेहनतीला फळही तितकेच गोड मिळत होते. बायजूला आता नाव, प्रसिद्धी आणि पैसा या तिन्ही गोष्टी भरभरून प्राप्त होत होत्या. आणि आता वेळ आली होती ह्या सर्व गोष्टींमध्ये शंभर पटीने वाढ होण्याची. म्हणतात ना तुम्ही जर प्रामाणिक प्रयत्न केलेत तर परमेश्वर त्या प्रयत्नांना तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात फळ देतो, अगदी तसंच झालं.
या प्रवासाला कलाटणी मिळाली जेव्हा त्याच्याच क्लासमधून प्रवेश परीक्षा पार करून आयआयएम मध्ये एमबीए करून आलेले विद्यार्थी बायजूला येऊन भेटले. शालेय विद्यार्थ्यांसाठी बायजूच्या क्लासेसची निर्मिती व्हावी, अशी कल्पना त्यांनी मांडली. यातूनच बायजूज् क्लासेसची पॅरेण्ट कंपनी थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना झाली. २०११ मध्ये माझे आठ विद्यार्थी आणि मी आम्ही या कंपनीची स्थापना केली. आज आमच्या ग्रुपचा विस्तार झाला आहे. आज दोन हजारहून अधिक जण या कंपनीत कार्यरत आहेत. कदाचित हे अष्टप्रधान मंडळ जर नसतं तर बायजूज क्लासेस कधीच इतके मोठे होऊ शकले नसते. या शब्दात बायजू आपल्या विद्यार्थ्यांचा आणि आताच्या मॅनेजर्सचा गौरव करतो.
२०११ पर्यंत आमचा फोकस केवळ सर्व प्रकारच्या प्रवेश परीक्षांवर होता. इथून पुढे आम्ही शालेय विद्यार्थ्यांवर फोकस करण्याचे ठरवले. म्हणूनच २०११ ते २०१५ या काळात आम्ही पूर्णपणे कन्टेन्ट डेव्हलपमेंटला वाहून घेतलं. शालेय विद्यार्थ्यांची मानसिकता, त्यांचा अभ्यासक्रम, त्यांची समजून घेण्याची पद्धत या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आम्ही त्यांच्यासाठी ॲनिमेटेड व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. आणि २०१५ मध्ये बायजूज् लर्निंग अँप लॉन्च केले. पुढील एका वर्षाच्या आतच ५५ लाख विद्यार्थ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले. त्यातील अडीच लाख विद्यार्थ्यांनी वार्षिक सबस्क्रीप्शन विकत घेतले होते.
विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट समजण्यासाठी आणि ती जास्त काळ लक्षात राहण्यासाठी ती केवळ वाचन करून चालत नाही तर त्या गोष्टीचे, त्या ज्ञानाचे चित्रीकरण जर डोळ्यासमोर उभे राहिले तर ते प्रभावशाली शिक्षण होते. आणि म्हणूनच बायजूच्या प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये, प्रत्येक विषयामध्ये, कुठेही, गोष्टीचे चित्रिकरण, अॅनिमेशन केले जाते. अशा प्रकारचे अॅनिमेटेड व्हिडिओज बनवण्यासाठी एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे. या टीम मध्ये अनेक डिझायनर्स, कंटेंट डेव्हलपर्स, संगीतकार आहेत. म्हणजे प्रत्येक विषय व प्रत्येक धडा अधिकाधिक रंजक करून विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न असतो. त्यामुळेच विद्यार्थीही कंटाळा न करता या ॲप मधून अभ्यास करतात.
रुपये दोन लाख मात्र इतक्याच गुंतवणुकीतून सुरु झालेला हा व्यवसाय आज शेकडो कोटी रुपयांचा बनला आहे. यात पहिलं फंडिंग २०१३ मध्ये मिळालं. मणिपाल इन्स्टिट्यूटचे मोहनदास पै आणि रंजन पै यांनी पन्नास कोटी रुपये दिले. २०१६ मध्ये तीन वेगवेगळ्या गुंतवणूकदारांनी १४० मिलियन डॉलर्स इतकी गुंतवणूक केली. यात फेसबूकच्या मार्क झुकरबर्ग यांच्या एका संस्थेने ५० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक या कंपनीत केली. अशाच प्रकारे २०१७ मध्ये ७० दशलक्ष डॉलर्स, २०१८ मध्ये ५४० दशलक्ष डॉलर्स इतकी गुंतवणूक वेगवेगळ्या परदेशी गुंतवणूकदारांनी केली. केवळ २०२० मध्येच १०२३ दशलक्ष डॉलर्स इतकी मोठी गुंतवणूक मिळवण्यात बायजूला यश आले आहे. आज कंपनीची बाजारातील किंमत तब्बल ८० हजार कोटीहून अधिक आहे.
या शिखराला पोहोचूनही बायजूची घोडदौड सुरूच आहे. कंपनीच्या विस्तारासाठी गेल्या चार वर्षात त्यांनी देश-विदेशातील सहा कंपन्या खरेदी केल्या आहेत. त्यामुळेच आता बायजूचा व्यवसाय हा भारतापुरता मर्यादित नसून अरब देश व अमेरिका इथपर्यंत देखिल पोहोचलो आहे. बिझनेसच्या जगतात आज बायजूचे नाव अतिशय मानाने घेतले जाते. जाहिरातींसाठी चक्क शाहरुख खान ला नाचवणे असेल किंवा थेट आयपीएलचे प्रायोजकत्व घेणे असेल यातून बाजूने आपली ताकद जगाला दाखवून दिली आहे.
बहुप्रतिष्ठित हावर्ड बिझनेस स्कूलच्या केस स्टडीज मध्ये देखील बायज्यूज् द लर्निंग ॲपची केस स्टडी आज शिकवली जात आहे. यापेक्षा अभिमानास्पद बाब अजून काय असू शकते. आज बायज्यूज् ही भारतातील सर्वात मोठी शिक्षण तंत्रज्ञानात काम करणारी कंपनी आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या कंपन्यांपैकी बायज्यूज् ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आज ज्या लाखो विद्यार्थ्यांना या ॲप मधून शिक्षण दिले जाते. ते सर्व विद्यार्थी इंग्लिश माध्यमाचे आहेत. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना हे शिक्षण पुरवणारा बायजू मात्र स्वतः मल्याळी माध्यमामध्ये शिकलेला आहे. लवकरच स्थानिक भाषांमध्ये देखील बायजूज धडे उपलब्ध होतील, अशी ग्वाही कंपनीकडून देण्यात आली आहे.
या यशाचं श्रेय तो आपल्या आई-वडिलांना व त्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याला देतो. या सोबतच त्याच्या मते खेळांमधून आपोआपच नेतृत्व, खिलाडू वृत्ती, हारल्यावर निराश न होणे, टीम वर्क असे अनेक गुण विकसित झाले. त्याचा फायदा मला आजही माझ्या व्यवसायात होत आहे, असे बायजू अभिमानाने सांगतो.
(लेखकाशी संपर्क. मो. ९९२१२१२६४३. ई मेल – prof.prasadjoshi@gmail.com)