मुंबई – महाराष्ट्र सरकारने काही निवडक इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर अर्ली बर्ड बेनिफिट स्किम ३१ मार्चपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी राज्य सरकारच्या या योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपणार होती. ही योजना Tata Nexon EV आणि Tigor EV या दोन वाहनांवर लागू आहे. योजनेअंतर्गत वाहनांवर एक लाख रुपयांची सवलत मिळणार आहे. त्यामध्ये ईव्ही पॉलिसीसह एकूण २.५ लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.
अशी मिळणार सवलत
महाराष्ट्र ईव्ही पॉलिसीअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर प्रति kWh ५००० रुपयांचा बेसिक इन्सेंटिव्ह (कमाल १.५० लाख रुपये) दिला जाणार आहे. त्याशिवाय अर्ली बर्ड बेनिफिट स्किम अंतर्गत ३१ मार्च २०२२ पर्यंत १ लाख रुपयांची सवलत दिली जात आहे. याचाच अर्थ असा की महाराष्ट्रात एकूण २.५ लाखांपर्यंतच्या सवलतीवर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करू शकता येणार आहे. विशेष म्हणजे Tigor EV चे सर्व प्रकार अनुदानासाठी पात्र आहेत.
Tata Tigor EV
ही देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. तिची किंमत ११.९९ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. टाटा टिगोर ईव्हीमध्ये २६ kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ती पूर्ण चार्ज केल्यावर ३०६ किलोमीटरपर्यंतची रेंज देते. तिची मोटर ७४ बीएचपी आणि १७० एनएम टार्कचा आउटपूट देते.
Tata Nexon EV
टाटा नेक्सॉन ईव्हीची किंमत १३.९९ लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. देशात सर्वाधिक विक्री होणारी ही इलेक्ट्रिक कार आहे. यामध्ये ३०.२ kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी इलेक्ट्रिक मोटरच्या माध्यमातून १२७ bhp आणि २४५ एनएम टार्क ऑउटपूट जनरेट करते. फुल चार्ज असताना नेक्सॉन ईव्ही ३१२ किमीपर्यंत धावू शकते.