नवी दिल्ली – अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या ठिकाणांवर वस्तू आणि सेवाकर गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) पथकाने छापा मारून कोट्यवधीची माया हस्तगत केली आहे. रात्री उशिरापर्यंत १७९ कोटींहून अधिक रोख रक्कम मोजण्यात आली होती. नोटांच्या मोजणीसाठी ३० हून अधिक कर्मचारी, १३ नोटा मोजण्याचे मशीन काम करत आहेत. आतापर्यंत मोजण्यात आलेली रक्कम ८० पेट्यांमध्ये भरण्यात आली. हे पैसे स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पाठविण्यासाठी चक्क कंटेनर बोलवावा लागला. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्थेत हे पैसे कंटेनरद्वारे बँकेत रवाना करण्यात आले आहेत. पीयूष जैन यांच्या कन्नौज येथील घरातून १ कोटींहून अधिक रकमेचे दागिने आढळले आहेत.
पीयूष जैन यांच्या कन्नौज येथील घरात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत डीजीजीआयकडून छापेमारी सुरू होती. चाव्या न मिळाल्यामुळे हातोड्याने कपाटांचे कुलूप तोडण्यात आले. यातून चार कोटी रुपये आणि एक कोटीचे दागिने पथकाने हस्तगत केले. पथकाने स्थानिक पोलिसांकडून डुप्लिकेट चावी बनविणार्या पिता-पुत्राला पाचारण केले. पीयूष जैन यांच्या आनंदपुरी येथील घरातील भिंतीतून नोटांचे बंडल सापडले आहेत. बुधवारी कारवाई केल्यापासून अधिकार्यांना बंद असलेले कपाटे सापडले आहेत.
भिंतीतून बाहेर आले नोटांची बंडले
पीयूष जैन यांना अनेक वेळा अधिकार्यांनी संपर्क साधला. परंतु तो होऊ शकला नाही. दुसर्या दिवशी अधिकार्यांनी दुसर्या चाव्यांनी कुलूप उघडले. त्यावेळी घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. या नोटांची गणना शुक्रवारपर्यंत सुरू होती. तपासादरम्यान अधिकार्यांनी घरातील काही भिंतींची बनावट थोडी वेगळी वाटली. संशय आल्याने भिंतींना ठोकून बघितले असता भिंत आतून पोकळ असल्याचे लक्षात आले. भिंतींना तोडल्यानंतर नोटांचे बंडल खाली पडायला सुरुवात झाली. हे बंडल प्लॅस्टिक आणि कागदात पॅक करण्यात आले होते. ही बंडले पाचशे आणि शंभरच्या नोटांची होती.
छापेमारीमुळे शहरात एकच गोंधळ
शहरात छापेमारी सुरू झाल्यानंतर इतर व्यावसायिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक व्यावसायिकांनी कारखाने बंद करून पैसे इकडे-तिकडे लपवून ठेवले. तर अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. रात्री उशिरापर्यंत व्यावसायिक एकमेकांना फोन करून पथकाच्या लोकेशनची माहिती मिळवत होते.
२७ सदस्यीय पथकाकडून कारवाई
अत्तर आणि इतर मिश्रण बनविणार्या व्यावसायिकांच्या ठिकाणांवर छापा मारणार्या २७ सदस्यांच्या पथकाने खूपच गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली. पथकाजवळ नंबर नसलेल्या बाइकसुद्धा होत्या. पथकातील काही सदस्य जवळपास दहा दिवस व्यावसायिकांच्या घरे, कारखाने आणि दुकानांच्या आसपास फिरून माहिती गोळा करत होते, असे बोलले जात आहे.