पुणे – कोरोना महामारीमुळे देशात अनेक नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. तुम्ही सुद्धा सध्या बेरोजगार असाल आणि एखादा व्यवसाय करू इच्छित असाल, तर तुम्हाला केंद्र सरकारकडून मदत मिळू शकते. सरकारच्या योजनेअंतर्गत तुम्हाला ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. सरकारच्या या योजनेबद्दल आणि त्याचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात याबद्दल आपण जाणून घेऊयात.
मुद्रा लोन योजना
नागरिकांना आपला व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने मुद्रा योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्जाची सुविधा दिली जाते. या योजनेत तुम्हाला सोप्या पद्धतीने कर्ज मिळू शकते. कोणतीही हमी नसताना तुम्हाला कर्ज मिळते हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये कोणतेही प्रक्रिया शुल्क द्यावे लागणार नाही. पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणतेही निश्चित व्याजदर नाहीत. मुद्रा लोनसाठी बँकांकडून वेगळ्या दराने व्याज वसूल केले जाते. साधारणपणे किमान व्याजदर १२ टक्के आहेत.
मुद्रा लोन तीन प्रकार
पीएम मुद्रा लोनचे फायदे तीन टप्प्यात मिळू शकतात. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात शिशू लोन, दुसरा टप्पा किशोर लोन आणि तिसरा टप्पा तरुण लोन असे टप्पे आहेत. शिशू लोनमध्ये ५० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. किशोल लोनमध्ये५० हजारांपासून ५ लाख रुपयांचे कर्ज मिळते. तसेच तरुण लोनमध्ये ५ लाख ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले जाऊ शकते.
कर्ज कोण घेऊ शकतो
लहान व्यावसायिक, दुकानदार, फळे-भाज्या विक्रेते, अन्न प्रक्रिया उद्योग या कामांसाठी पीएम मुद्रा लोन लाभार्थी घेऊ शकतात. हे कर्ज सरकारी बँक, खासगी बँका, परदेशी बँका, ग्रामीण बँका आणि सहकारी बँकांमधून घेता येते. आरबीआयने २७ सरकारी बँका, १७ खासगी बँका, ३१ ग्रामीण बँका, ४ सहकारी बँका, ३६ मायक्रो फायनान्स संस्था आणि २५ गैरबँकिंग आर्थिक कंपन्या (एनबीएफसी) यांना मुद्रा लोन देण्यास अधिकृत करण्यात आले आहे.
असे मिळेल कर्ज
इच्छुक https://www.mudra.org.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज डाउनलोड करू शकणार आहेत. अर्जामध्ये सर्व तपशील पूर्ण भरणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करणेही आवश्यक आहे. बँकेचे व्यवस्थापक तुमच्या कामकाजाची माहिती घेतील. त्याच आधारावर तुम्हाला कर्ज मंजूर होईल.