इंडिया दर्पण ऑनवाईन डेस्क
कुर्ला येथील अपघातातील बस चालक हा कंत्राटी असून चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. मोठी वाहन चालवण्याचा अनुभव नसताना या ड्रायव्हरला काम मिळाले कसे, एवढी मोठी बस चालवायला देताना आधी तपासले नव्हते का ड्रायव्हर बस चालवू शकतो का? या अक्षम्य कारभार साठी बेस्ट प्रशासन जबाबदार आहे त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
त्यांनी म्हटले आहे की, कुर्ला पश्चिम येथील आंबेडकर नगर रोड भागात भरधाव बेस्ट बसने धडक दिल्याने घडलेला अपघात अत्यंत दुःखद आहे. अपघातात ७ जणांचा मृत्यू आणि ४९ नागरिक गंभीर जखमी झाल्याचे माहिती पुढे आली आहे. या दुर्घटनेतील मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, ही प्रार्थना करतो. मृतांच्या कुटुंबीयांना आणि अपघातात जखमींना तातडीने सरकारने मदत द्यावी ही आमची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.
हा अपघात काल झाला. त्यात अनेक वाहनांचे सुध्दा नुकसान झाले. हा अपघात कसा झाला याबाबत वेगवेगळे तर्क काढण्यात आले. पण, हा अपघातामधील बसचा चालक हा कंत्राटी असल्याचे समोर आले. त्याला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता.