नवी दिल्ली (इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क) – बुलीबाई अॅप प्रकरणातील मुख्य आरोपी आणि मास्टरमाइंड नीरज बिश्नोई हा एक हुशार, संवेदनाहीन युवक असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्याकडून काहीही काढून घेणे खूपच कठीण आहे. त्याने पोलिसांच्या ताब्यात आत्महत्या करण्याची धमकीही दिली आहे. यादरम्यान त्याने स्वतःला मारून घेत इजा करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ स्पेशल दलाने ही माहिती दिली. ४८ तासांपेक्षाही अधिक काळ पोलिसांच्या ताब्यात राहिल्यानंतर बिश्नोई दर तासाला नवा खुलासा करत आहे. न्यायालयाने बिश्नोईला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस कोठडीत नीरजने चौकशी करणाऱ्या अधिकार्यांना सांगितले की, त्यांनी त्याला Giyo या नावाने हाक मारावी. त्याने हे नाव जापानी कॉमिक पुस्तकातील काल्पनिक पात्र Giyu Tomioka या नावावरून घेतले आहे. हा Giyu राक्षसांना मारतो. गेल्या दोन वर्षांमध्ये बिश्नोईने Giyo च्या नावाशी मिळते-जुळते नावांवर पाच ट्विटर अकाउंट उघडले आहेत. या अकाउंटच्या माध्यमातून वादग्रस्त अॅप प्रमोट करत होता. तसेच सोशल मीडियावर महिलांविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिश्नोई जेव्हा १५ वर्षांचा होता, तेव्हा त्याने एका शाळेचे संकेतस्थळ हॅक केले होते. त्याला हॅक करण्याचे व्यसनच लागले होते. गेल्या काही काळात बिश्नोईने पाकिस्तानी शाळा आणि विद्यापीठांचे संकेतस्थळ हॅक केल्याचेही म्हटले आहे. त्याने सांगितलेल्या गोष्टींबद्दल तथ्य शोधण्याचे काम पोलिस करत आहेत. बिश्नोईला दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओ स्पेशल सेलने बुधवारी रात्री आसाममधील जोरहाटमधून अटक केली होती.
आयएफएसओ स्पेशल सेलचे पोलिस महासंचालक के. पी. एस. मल्होत्रा म्हणाले, सुल्ली डील नावाच्या अॅपच्या निर्मात्यांना ओळखत असल्याचे आरोपीने कबूल केले आहे. या अॅपवर मुस्लिम महिलांचा लिलाव करण्यात आला होता. त्याचा श्वेता सिंहच्या युजर अकाउंटपर्यंच पोहोच आहे हे सुद्धा त्याने स्वीकारले आहे. श्वेता सिंह हिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मानसिक स्थिती योग्य नसल्याने त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुली बाई अॅपचा कथित प्रमुख आणि ते बनविणारा नीरज बिश्नोईने हा दावा केला की, त्याने भारत आणि पाकिस्तानमधील शाळा आणि महाविद्यालयांची संकेतस्थळे हॅक केली आहेत. त्यासोबत त्याला छेडछाड करण्याची सवय आहे, असेही पोलिसांनी सांगितले.