मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोशल मीडियावरील एका अॅपवरील आक्षेपार्ह मजकुरामुळे मोठा गदारोळ उडाला आहे. त्या अॅपचे नाव आहे बुल्ली बाई. या अॅपवर मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करून असभ्य भाषेत टिप्पणी केली जात आहे. एवढेच नव्हे, तर या फोटोंचा व्यवहार होत असल्याचा आरोप केला जात आहे. एका महिला पत्रकाराचे फोटो अपलोड करून आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्यानंतर गदारोळ उडाला आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बुल्ली बाई नावाच्या अॅपवर मुस्लिम महिलांच्या फोटोशी छेडछाड करण्यात येत आहे. त्या फोटोंचा सोशल मीडियावर हॅशटॅगप्रमाणे वापर केला जात आहे. फोटोशी छेडछाड केल्याचा आरोप महिला पत्रकाराने केला असून तिने पोलिसांत तक्रार केली आहे. गिटहब या होस्टिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून शेकडो मुस्लिम महिलांचे फोटो एका अॅपवर अपलोड करण्यात आल्याची माहिती, खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी दिली.
प्रियंका चुतर्वेदी म्हणाल्या, की हा मुद्दा मुंबई पोलिसांसमोर उपस्थित केला असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. मुंबई पोलिस आयुक्त आणि गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याशीही यासंदर्भात बोलणे झाले आहे. त्या याची चौकशी करत आहेत. महाराष्ट्र पोलिस महासंचालकांकडेही हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. संशियतांना पोलिस त्वरित अटक करतील अशी अपेक्षा आहे, असे ट्विट खासदार चतुर्वेदी यांनी केले आहे.
https://twitter.com/priyankac19/status/1477510716357632000?s=20
खासदार चतुर्वेदी म्हणाल्या, की माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून, अशा संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लाजिरवाणी गोष्ट म्हणजे अशा प्लॅटफॉर्मकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकरणाची दखल घेतली असून, संशयितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.