इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचा सूरत ते बिलमोरा हा पहिला टप्पा २०२७ मध्ये सुरू होईल, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिली. या बुलेट ट्रेन मार्गावरच्या घणसोली ते शीळफाटा यादरम्यानच्या बोगद्याचं जोडकाम वैष्णव यांच्या उपस्थितीत आज पूर्ण झालं, त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते. या प्रकल्पाचा ठाण्यापर्यंतचा टप्पा २०२८ पर्यंत, तर वांद्रे-कुर्ला संकुलापर्यंतचा भाग त्यापुढच्या वर्षी पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
घणसोली ते शीळफाटा हा ४ पूर्णांक ९ दशांश किलोमीटर लांबीचा बोगदा, बीकेसी ते शीळफाटा या समुद्राखालून जाणाऱ्या २१ किलोमीटरच्या बोगद्याचा महत्त्वाचा टप्पा असून यात ठाणे खाडीखालून जाणाऱ्या ७ किलोमीटर भागाचाही समावेश आहे. बोगद्याचा ब्रेकथ्रू हा बीकेसी ते शीळफाटा या समुद्राखालून जाणाऱ्या एकवीस किलोमीटर बोगद्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. यामध्ये ठाणे खाडीतल्या ७ किलोमीटर भागाचाही समावेश आहे. नवीन ऑस्ट्रीयन टनेलिंग पद्धतीने या बोगद्याच्या ब्रेकथ्रूचं काम करण्यात आलं आहे असंही वैष्णव यांनी यावेळी नमूद केलं.
बुलेट ट्रेनमुळे अहमदाबाद ते मुंबई प्रवासाचा वेळ २ तास ७ मिनिटांवर येईल. तसंच या मार्गावरच्या अनेक महत्त्वाची आर्थिक केंद्रं यामुळे जोडली जातील असा विश्वास, वैष्णव यांनी व्यक्त केला. जपानहून या कामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या तज्ज्ञ पथकानं कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केल्याचं त्यांनी सांगितलं. बुलेट रेल्वेच्या कामात अनेक ठिकाणी स्वदेशी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि सुटे भाग वापरले असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं.