इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– बुलेटवरील राईडचा थरार –
सीएम योगींसोबतची अनोखी भेट
गेल्या लेखात आपण पाहिलं की आम्ही उत्तर प्रदेशात एण्ट्री कशी केली. आणि त्यावेळी नेमकं काय आणि कसं घडलं. खरं तर हे सगळे अनुभव आमच्यासाठी खुप महत्त्वाचे आहेत. आता आपण उत्तर प्रदेशातील प्रवास जाणून घेऊ..
मोरादाबाद वरून बरेली आणि बरेली होऊन लखनऊ असा प्रवास झाला. लखनऊ मध्ये पोहोचल्यानंतर आज आम्हाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भेटायचे होते. म्हणजेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री. तुम्हाला खोटं वाटेल परंतु आम्ही सगळे त्यांना भेटणार या विचारानेच घाम फुटत होता. सीएम निवासामध्ये आमच्या गाड्यांच्या एन्ट्री करण्यापूर्वी जवळपास एक किलोमीटर आधीच आमच्या जवळील मोबाईल फोन, जीपीएस ट्रॅकर आणि इतर सर्व प्रकारचे शूटिंग किंवा फोटो काढण्याचे साहित्य हे जमा करून घेण्यात आले. त्याचे कारणही तसेच होते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणजे कोणी साधीसुधी व्यक्तिमत्व नाही. त्यांच्या सिक्युरिटी मध्ये कोणतीही चूक व्हायला नको म्हणून या सगळ्याची काळजी घेतली जात होती.
आता गेटमधून एन्ट्री केल्यानंतर जवळजवळ एक किलोमीटर आत गेल्यावर सीएम यांचा बंगला होता. पार्किंग मध्ये शिस्तबद्ध पद्धतीने गाड्या पार्क केल्यानंतर एक एक करून आमची झडती सुद्धा घेण्यात आली. आणि मग तिथे असलेल्या कार्यकर्त्यांकडून आमचे स्वागत करण्यात आले. आमच्यासाठी चहा नाश्त्याची व्यवस्था सीएम हाऊस मध्ये करण्यात आली होती.
चहा नाश्ता करून झाल्यानंतर एका हॉलमध्ये आम्हाला नेण्यात आले. जिथे स्वतः मुख्यमंत्री योगी आले होते. आमच्याशी त्यांनी पाच मिनिटे संवाद साधला. महिला या राईड मध्ये आहेत त्याचा त्यांना प्रचंड अभिमान आणि आनंद झाला. तसे त्यांनी आम्हाला बोलून पण दाखवले. मग आमच्या संपूर्ण टीमला रायडर्स प्लस बॅकअप टीम आम्हा सगळ्यांना मुख्यमंत्र्यांनी लखनऊचे स्पेशल नवाबी अत्तर प्रत्येकाला गिफ्ट स्वरूपात दिले. आणि आमच्या फ्रीडम मोटोरोला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. लखनऊ मधून वाराणसीला जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – Dipikamore.19@gmail.com
Bullet Bike Ride UP CM Yogi Adityanath Meet by Deepika Dusane