इंडिया दर्पण विशेष लेखमाला
बुलेटवरील भारत भ्रमंतीचा थरार
लखनऊहून काशीकडे प्रयाण
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेऊन आता आम्ही लखनऊ मध्ये असलेल्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी कॉम्प्लेक्स च्या हॉस्टेलमध्ये आमची जेवणाची आणि राहण्याची सोय करण्यात आली. तेथून पुढच्या प्रवासाचा वेध आपण आजच्या भागात घेणार आहोत….
लखनऊ सारख्या मोठ्या शहरात हॉस्टेलमध्ये राहण्याची सोय फारशी बरी नव्हती. आणि जेवणात गेल्या पंचवीस दिवसापासून खात असलेले पनीरची भाजी होती. मग मी आणि माझ्यासारख्या फूड प्रेमींनी निर्णय घेतला की आज होस्टेलचे जेवण जेवायचं नाही. याउलट लखनऊ मध्ये सरसपाटा मारून तेथील फेमस तुंडे कबाब खावे. उत्तर प्रदेशचे तुंडे कबाब म्हणजे खुप फेमस आहेत आणि तेथील बिर्याणी सुद्धा अतिशय लाजवाब आहे. हे ऐकून असल्यामुळे तिथे जाण्याचा मोह आम्ही आवरू शकत नव्हतो.
माझ्या बाकीच्या सहकाऱ्यांना लखनऊ मार्केट फिरायचे होते. मला फक्त खाण्यात इंटरेस्ट असल्यामुळे त्यांचे फिरणे होईपर्यंत मी मस्त पार्लरला जाऊन हेअर कट करून घेतले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली होती. मग सरळ तुंडे कबाब गाठले. तिथे फेमस असलेल्या सर्व प्रकारच्या सर्व डिश सफाचट करून झाल्या. होस्टेलवर परत येत असताना लखनऊ मधील आमचे काही मित्र आणि बायकिंग कम्युनिटी मध्ये प्रसिद्ध असलेले श्रीराज मिर्झा व इतर काही बायकर्स आम्हाला भेटायला आले. त्यांच्याशी गप्पा मारण्यात बरीच रात्र झाली होती. त्यांचा निरोप घेऊन आता आम्ही हॉस्टेलला माघारी आलो. सकाळी उठून माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा असलेल्या आणि सध्याच न्यूज मध्ये असलेल्या वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराला भेट द्यायची होती.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लखनऊच्या फेमस रमी दरवाजाजवळ आमच्या रायडर्सचा सत्कार आणि फोटोशूट करायचे ठरले होते. रमी दरवाजा हा लखनऊच्या मेन सिटी मध्ये असून गजबजलेला परिसर आहे. म्हणून सकाळी सात वाजता तिथे जायचे ठरले होते. आणि सकाळी सात वाजता तिथे पोहोचल्यावर बघतो तर काय भयंकर ट्रॅफिकने तो परिसर वेढलेला होता. कसा बसा पोलिसांच्या मदतीने थोडा वेळ ट्राफिक अडवून आम्हा सगळ्यांचा सत्कार करून सगळ्यांचा एकत्र फोटो काढून आम्ही वाराणसीच्या दिशेने पुढे गेलो. गंमत म्हणजे एकाच वेळी एका फ्रेम मध्ये रमी दरवाजासमोर 75 बायकर्स ला एकत्र करण्यात नाकी नऊ आले.
लखनऊ आणि सुलतानपूर मार्गे साधारण साडेचार वाजता वाराणसी येथे पोहोचलो. काशी विश्वनाथ मंदिरला भेट देऊन रात्री गंगा आरती करायची होती. सहा वाजता आम्हाला पोलिसांचा ताफा घ्यायला येणार होता. सहा वाजेपर्यंत आम्हाला सर्वांना हॉटेलच्या पार्किंग मध्ये तयार राहण्यास सांगण्यात आले होते. आणि ठरल्याप्रमाणे आम्हाला गर्दीतून कॉन्व्हय देण्यासाठी साधारण 15 ते 20 पोलीस आणि त्यांच्या पाच गाड्या तिथे शार्प सहा वाजता हजर झाले. त्यावेळी माझी उत्सुकता फार शीगेला पोहोचली होती. त्याचे कारणही तसेच होते. काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असून त्यावेळी ते चर्चेत होते. त्याचे कारण म्हणजे मंदिराला लागून असलेली ज्ञानव्यापी मज्जिद.
काही दिवसांपूर्वीच मी त्या मशिदीबद्दल भरपूर बातम्या ऐकल्या होत्या. आणि तिथे असलेला नंदी तो माझ्या आकर्षणाचा मुख्य केंद्र होता. अर्थातच आम्ही पोलिसांच्या कॉन्हॉय सोबत गेल्यामुळे आणि स्पोर्ट्स ऑथॉरिटी चे काही प्रमुख पदाधिकारी सोबत असल्यामुळे आमच्या व्हीआयपी दर्शनाची सोय झाली. भयंकर गर्दीच्या लोटातून आम्हा बायकर्सला सेपरेट गेटने दर्शनासाठी डायरेक्ट महादेवाच्या गाभाऱ्यात नेण्यात आलं. त्या क्षणी आपण किती सौभाग्यशाली आहोत याचा प्रत्यय आला. मग आम्ही महादेवाला साकडे घातले की, उरलेला प्रवास सुखरूप पार पडू दे. आम्ही गाभाऱ्यातून बाहेर आलो आणि मग तिथे असलेल्या त्या फेमस नंदीजवळ मी गेले. आणि खरोखर बातम्यांमध्ये दाखवल्याप्रमाणे तो नंदी ज्ञानव्यापी मशिदी कडे तोंड करून बसलेला होता. तो प्रचंड विलक्षण अनुभव आणि क्षण होता.
मंदिराच्या ट्रस्ट कडून आम्हा सर्वांचा सत्कार करण्यात आला. शाल व श्रीफळ देऊन आमच्या सोबत तिथल्या ट्रस्टने फोटो काढले आणि आता आम्ही आमचा ताफा वाराणसीच्या फेमस काशी चाट भंडारकडे वळवला. वाराणसी मधलं काशी चाट भांडार हे अतिशय फेमस असून तिथली पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, रगडापुरी आणि फालुदा हा अतिशय फेमस आहे. तिथे मनसोक्त ताव मारून आता गंगा आरतीसाठी गंगा घाटावर जाण्याचे ठरले.
रात्री नऊ वाजता गंगा आरती होणार होती. परंतु गंगा आरतीचं नेहमीचे ठिकाण हे पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे बंद ठेवण्यात आले होते. मग तिथूनच थोड्या अंतरावर असलेल्या आणखी एका घाटावर दुसरी एक गंगा आरती होणार होती. मी आणि माझे सहकारी त्या घाटापर्यंत पोहोचलो आणि तिथे आरती चालू असताना क्षणाक्षणाला माझ्या अंगावर शहारे उभे राहत होते कारण डमरू शंखनाद आणि ते वातावरण हे आजपर्यंत फक्त टीव्हीवर पाहिले होते त्या दिवशी तिथे पाहिलेली गंगा आरती एक कायम स्मरणात राहणार.
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – Dipikamore.19@gmail.com
Bullet Bike Ride India Tour Kashi Visit by Deepika Dusane