इंडिया दर्पण विशेष लेखमाला
– बुलेटवर बाईक राईडचा थरार –
डेहराडून ते उत्तर प्रदेश प्रवासाचा किस्सा…
जिसपा नंतर मंडी आणि मंडी नंतर शिमला असा आमचा हिमाचल प्रदेश मधला प्रवास अखंड सुरू होता. शिमला मध्ये आम्ही चौदाव्या दिवशी पोहोचलो. साधारण दुपारी चार वाजता पोहोचलो आणि इंदिरा गांधी खेळ परिसर या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये पोहोचलो. ऑफ इंडिया तर्फे आमचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. शिमला मध्ये ती रात्र आणि एक दिवसाचा मुक्काम केल्यानंतर कसौली आणि त्यानंतर देहरादून असा प्रवास होता. पण कसौली ते देहरादून हा 200 किलोमीटरचा संपूर्ण प्रवास प्रचंड पावसात पूर्ण करावा लागला. त्यादिवशी पाऊस थांबायलाच तयार नव्हता. आणि त्याची तीव्रता पण एवढी होती की जॅकेटच्या आत मधून आम्हाला तो जाणवत होता. असं करत संध्याकाळी आठ वाजता डेहराडून मध्ये पोहोचलो.
त्यादिवशी आमच्यातील नीता मॅडमचा वाढदिवस होता. वयाच्या साठाव्या वर्षात त्या पदार्पण करत होत्या. खरंतर ते आमच्यासाठी खूप मोठा आधार होत्या. आणि या वयातही त्या आमच्या इतक्याच उत्साही होत्या. त्यांच्या बर्थडेचा रात्री जेवणानंतर केक कापला आणि दुसऱ्या दिवशी देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकॅडमी गुरुकुल ज्याला IMA असे संबोधले जाते. तिथे कोणीही सिटीझनचा प्रवेश हा मान्य नसतो. परंतु आम्हा फ्रीडम मोटोराइडर्ससाठी तिथेही आमच्या स्वागताची तयारी करण्यात आली होती. तो क्षण प्रचंड भावूक होता. आयएमए मध्ये पाहणी केल्यानंतर आता देहरादून हून प्रवास मोरादाबाद (उत्तर प्रदेश)च्या दिशेने सुरू करायचा होता.
वाटेत मी व माझी रूम मेट आणि अजून एक सोबती एका पेट्रोल पंपावर वॉशरूमसाठी पाच मिनिटांचा हॉल्ट घेतला. तेवढ्यात आमच्या सोबतचा ताफा त्यांच्या नकळत आम्हाला सोडून पुढे निघून गेला. आता मागे नेमके आम्ही तिघेच राहिलो. आमच्या सोबत गुगल मॅप होता. भितीदायक काही नव्हते. पण बऱ्याच वेळा गुगल बाबा कडून पण वाट चुकवली जाते. तसेच मोरादाबाद मध्ये बर्गर सिंग मध्ये आमचा लंच ठेवण्यात आला होता. परंतु गुगल बाबाच्या कृपेने वाट चुकून आम्ही तिघे सहकारी चुकीच्या वाटेने आणि उसाच्या आणि गव्हाच्या शेतीमधून भलतीकडेच भरकटलो.
बरं तिथल्या लोकल माणसांना बर्गर सिंग हे नाव सुद्धा अपरिचित असल्याने आमचा तिघांचा फार गोंधळ उडाला. परंतु थोडा विचार करून आणि डोकं शांत करून पुढे गेलेल्या सहकाऱ्यांच्या जीपीएसचा शोध घेत कसेबसे करत आम्ही बर्गर सिंग गाठले. तोपर्यंत संध्याकाळचे साडेचार वाजून गेले होते. पोटात भुकेने कावळे नुसते ओरडत होते. मला तर बर्गर सिंग मध्ये बसून ऑर्डर येईपर्यंत सुद्धा वाट बघवली जात नव्हती. इतकी भूक प्रचंड लागली होती. कशीबशी ऑर्डर येईपर्यंत इतर सहकाऱ्यांच्या प्लेट मध्ये मिळेल ते खाण्यास सुरुवात केली. त्यावेळी कडकडून भूक कशी लागते याचा प्रत्यय आला.
(क्रमशः पुढच्या भागात उत्तर प्रदेशातील वाटचाल)
सौ दिपिका दुसाने
इंदिरानगर, नाशिक
इ मेल – Dipikamore.19@gmail.com
bullet bike India Ride Google Map Wrong Road by Deepika Dusane