बुलडाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या सडेतोड विधानांसाठी ओळखले जातात. मंत्रीपद वगैरे तात्पूरत्या गोष्टी आहे. त्यामुळे आपण कुणाला घाबरत नाही, अशी भूमिका ते सातत्याने घेत असतात. रविवारी त्यांनी बुलडाणा दौऱ्यावर असतानाही ठेकेदारांविषयी एक धक्कादायक विधान केले. त्यामुळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या.
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी सध्या देशातील सर्वाधिक परफॉर्मन्स देणारे मंत्री आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात महामार्गांचे जाळे विणत त्यांनी आपल्या पक्षासह विरोधी बाकावरील नेत्यांचीही मने जिंकली आहेत. काम करताना पक्ष न बघणारा हा नेता त्याच्या रोखठोक भूमिकांसाठी सुद्धा ओळखला जातो. विशेषतः रस्त्यांची कामे करताना ठेकेदारांवरील त्यांचा वचक कायम चर्चेत राहिला आहे. खामगाव येथे अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग ५३ वरील ८१६ कोटींच्या शेळद ते नांदुरा प्रकल्पाचे गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी भाषण देताना गडकरी यांनी पुन्हा एकदा ठेकेदारांविषयी एक गौप्यस्फोट केला. ‘आम्ही ठेकेदाराकडून मालपाणी खाल्ले नाही. कधी लक्ष्मी दर्शन घेतले नाही. त्यांच्याकडून कवडीचा चहा प्यायलेलो नाही. काम मिळविण्यासाठी ठेकेदारांना माझ्या घरापर्यंत यावे लागले नाही. काम चांगलं असेल तर त्याला मिळणारच असतं. त्याचवेळी एखादा ठेकेदाराने चांगले काम केले नाही तर त्याला रडवल्याशिवाय राहणार नाही. कामावर तर अनेक ठेकेदारांनी माझ्या शिव्या खाल्या आहेत. एक दोन ठेकेदारांना तर मारण्यापर्यंत वेळ आली होती. खराब काम करणे ही जनतेशी बेईमानी आहे.’
यामुळे होतो आनंद
रस्ते जनतेचे आहेत, आम्ही त्याचे मालक नाही. आम्ही खासदार-आमदार फक्त सेवक आहोत. त्यामुळे एखाद्या भागातील लोक जेव्हा काम चांगले झाल्याचे सांगतात, विशेषतः या भागातील आमदार-खासदार काम झाल्याचे सांगतात, तेव्हा खूप आनंद होतो, अशी भावनाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
असा आहे महामार्ग
अमरावती-चिखली राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, (खामगाव) बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना जोडतो. तसेच रायपूर-नागपूर-सूरत या पूर्व-पश्चिम कॉरिडॉरसाठी उत्तम कनेक्टिव्हिटी म्हणून देखील हा महामार्ग महत्त्वपूर्ण आहे. या महामार्गावर केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत महामार्ग प्रकल्पालगत असलेल्या तलावांचे खोलीकरण करुन जलकुंभाची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे खामगावसारख्या उष्ण आणि सखल भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यात मदत होणार आहे.
Buldhana Minister Nitin Gadkari Contractor