मलकापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सात प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २५ ते ३० जण जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये तीन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. या अपघातामध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
एमएच ८ ९४५८ ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये ४० तिर्थयात्री होते. तर एम.एच २७ बी.एक्स. ४४६६ या ट्रॅव्हल्समध्ये ३० प्रवाशी होते. या दोन्ही बस समोरासमोर भिडल्याने दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना ॲम्बुलन्स वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे पोलिसांनी जखमींना पोलिसांच्याच वाहनाने मलकापूर उपजिल्हा रुग्णालय दाखल केले.
या ट्रॅव्हल्समध्ये हिंगोली जिल्ह्यातील यात्रेकरु होते. हे सर्व यात्रेकरु अमरनाथ यात्रा आटोपून हिंगोलीकडे जात होते. त्यावेळी हा अपघात झाला. यात्रेकरुंची रॉयल ट्रॅव्हल्सची बस हिंगोलीकडे जात होती. या बसला विरुद्ध दिशेने अमरावतीहून नाशिककडे जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने जोरदार धडक दिली. त्यामुळे हा अपघात झाला.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मलकापूर (जि. बुलढाणा) शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील रेल्वे उड्डाणपुलावर आज दोन खाजगी बसच्या अपघातामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अपघाताची माहिती घेतली असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याचे निर्देश दिले आहेत. या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला असून १९ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर योग्य ते वैद्यकीय उपचार शासकीय खर्चाने करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.