बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सामूहिक कॉपी प्रकरणात नऊ शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर आज गणिताचा पेपर फुटल्याची घटना घडली. बुलढाण्यात पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात गणिताचा पेपर फुटला आणि काही क्षणात तो सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यानंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.
राज्य शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाला हरताळ फासणाऱ्या घटना महाराष्ट्रात सातत्याने घडत आहेत. यात अनेक प्रकरणांमध्ये तर शिक्षक स्वतःच सहभागी झालेले आहेत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सिंदखेडराजा येथील एका परीक्षा केंद्रावर बारावीचा गणिताचा पेपर सुरू झाला आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर तो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यामुळे सारेच बुचकाळ्यात पडले. या प्रकरणाचा तातडीने तपास सुरू झाला आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित करून सरकारी यंत्रणेवर नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई होईल, अशी माहिती अमरावती शिक्षण मंडळाचे सचिव उल्हास नरड यांनी दिली आहे. घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून वेगाने तपास सुरू झाला आहे, असेही ते म्हणाले.
पुण्यातूनही आदेश
पेपरफुटी प्रकरणात तपास करून तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश पुण्यातील शिक्षण मंडळाकडूनही देण्यात आले आहेत. बुलढाण्याचे गट शिक्षणाधिकारी गावडे यांनी गणिताचा पेपर फुटल्याच्या प्रकरणात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे एवढे प्रकरण होऊनही कोणत्या केंद्रावरून पेपर फुटला, हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.
शिक्षकच कॉपी करतात तेव्हा
परभणी येथील घटना असो वा दौंडची घटना असो… शिक्षकच कॉपीसाठी मदत करतात तेव्हा शिक्षण क्षेत्राचं काय होणार, अशी चिंता व्यक्त होत आहे. परभणी येथे सहा शिक्षक शाळेच्या मागे बसून पेपर सोडवत होते तर दौंड येथे शिक्षकांच्या देखरेतील अख्ख्या केंद्रावरील विद्यार्थी कॉपी करत होते.
विधानसभेत मुद्दा
विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी कॉपीचे व पेपरफुटीचे प्रकरण सभागृहात चर्चेला आणले. सिंदखेडराजाच्या घटनेवरून त्यांनी नाराजी व्यक्त करत प्रश्न उपस्थित केला. त्याचवेळी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशी सुरू असल्याचे सांगितले.
गेल्या काही दिवसात राज्यात पेपरफुटीचे प्रकार वाढले आहेत. अभ्यास करणाऱ्या मुलांवर हा अन्याय आहे. पेपरफुटीच्या मागे कोणतं रॅकेट कार्यरत आहे का? याची सखोल चौकशी केली पाहिजे. दोषींवर कठोर कारवाई करून राज्यात सातत्यानं सुरु असणारे हे गैरप्रकार थांबले पाहिजेत.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 3, 2023
Buldhana HSC Exam Maths Paper Leak Crime FIR