बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मित्रासोबत राजूर घाटात पर्यटनासाठी आलेल्या महिलेवर ८ नराधमांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार बोराखेडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच दरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. तसेच आमदार गायकवाड यांनी पोलीसांवर अत्यंत आक्रमक ताशेरे ओढले आहेत, कारण गेल्या दीड महिन्यात राजूर घाटात सहा ते सात सामूहिक बलात्काराच्या घटना घडल्या असल्याचे गायकवाड म्हणाले आहेत.
आमदार गायकवाडांच्या तीन तास ठिय्या
बुलढाणा-मलकापूर मार्गावरील राजूर घाटात पावसाळ्यात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. एक महिला आपल्या मित्रासोबत राजूर घाटात फिरण्यासाठी आली होती. यावेळी देवीच्या परिसरात ते थांबले असताना अचानक ८ जणाचे टोळके तिथे आले, महिलेच्या मित्राला मारहाण करत या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील रक्कम काढून घेतली. आणखी वाईट गोष्ट म्हणजे या ८ नराधमांनी महिलेला दरीत ओढत नेले. तिथे तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. बलात्कार केल्यानंतर हे आरोपी फरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले. मोहेगावच्या ग्रामस्थांनी त्यातील एक आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे. दरम्यान, बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आरोपींविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल तीन तास पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. तसेच पोलीसांना चांगलेच धारेवर धरले आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामूहिक बलात्काराच्या ७ घटना
बुलढाणा शहराला लागून असलेल्या राजूर घाटात गेल्या दीड महिन्यात सामूहिक बलात्काराच्या घटना घडत असतानाही पोलीस सतर्क नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र बदनामी पोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या घाटात नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी आलेल्या एका महिलेवर चाकूचा धाक दाखवत सहा ते सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची पुन्हा एकदा घटना घडली आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरे म्हणजे राजूर घाटात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात. एक पर्यटक महिला तिच्या नातेवाईकांसह देवीच्या मंदिर परिसरात आली असता या तरुणी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून लुटले आणि यानंतर त्याच्यासमोरच संबंधित महिलेला सामूहिक बलात्कार केला. आठवडाभरात पुन्हा बलात्काराची घटना घडल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच आरोपींना तातडीने अटक करून कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.