बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विवाह सोहळा हा धुमधडाक्यात साजरा व्हावा, अशी अनेकांची इच्छा असते, आपआपल्या ऐपतीप्रमाणे प्रत्येक जण विवाह तथा लग्न समारंभात खर्च करत असतो, तसेच आपल्या देशात अनेकदा शाही विवाह सोहळे साजरे होतात, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि चित्रपट सृष्टीतील संबंधित मंडळींचे शाही विवाह सोहळे गाजले आहेत. मात्र विदर्भातील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचा शाही विवाह सोहळा साजरा केला याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. कारण हा विवाह सोहळा आगळावेगळा होता, यात वऱ्हाडी मंडळींबरोबर मुख्य प्राण्यांनाही पंगत देण्यात आली.
बुलढाणा जिल्ह्यातील कोथळी गावातील प्रकाश सरोदे या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या एकुलत्या एक कन्येचा विवाह सोहळा पार पडला. मात्र त्यांनी साधासुधा नाही आपल्या कन्येचा शाही विवाह केला. आपल्या लाडक्या कन्येचा म्हणजेच पूजाचा विवाह भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेल्या अतुल दिवाणे याच्याशी केला. अल्पभूधारक असूनही नातेवाईकांच्या मदतीने हा विवाह सोहळा म्हणजे परिसरातील सर्वांसाठी नेत्रदीपक ठरला.
या विवाहाची गंमत अशी की, या पंचक्रोशीतील ५ गावातील १० हजार लोकांना लग्नासाठी आणि जेवणासाठी निमंत्रणही देण्यात आले होते. या विवाह सोहळ्यासाठी गावालगत पाच एकर शेतात मंडप बांधण्यात आला होता. गावाजवळील पाच गावातील सर्वांना या विवाहाचे निमंत्रण देण्यात आले होते.
सर्वप्रथम गायीचे पूजन करून परिसरात असणाऱ्या सर्व गुरे, पशू पक्ष्यांनाही पंगत दिली. यासाठी गायींना दहा क्विंटल ढेप, गुरांना दहा ट्रॉली सुका चारा, परिसरातील पक्षांना तांदूळ, श्वानांना जेवण देण्यात आले, तर आपल्या कन्येच्या विवाहात मुंग्यांही उपाशी राहू नये म्हणून दोन क्विंटल साखर परिसरातील मुंग्यांना टाकण्यात आली. या अनोख्या लग्नाची जिल्ह्यात सर्वत्र एकच चर्चा होत आहे.
Buldhana Farmer Daughter Wedding Ceremony Viral